Saturday, July 27, 2013

तो आणि ती...पूर्वीच्या काळातील...

                        एक टिपूर चांदणी रात्र ....त्रिपुरी पौर्णिमा असावी तसं.... हवेत हवाहवासा वाटणारा गारवा. (टिपूर शब्दाचा उगम त्रिपूर याच शब्दात असावा ) नदीचा बांध... गावापासून दूर... अगदी गावाच्या सीमेपार...सायंकाळपासूनच ती दोघं होती. त्या बांधावर...आतुरतेनं एकमेकांना भेटलेली. उत्कट प्रेमानं भरलेल्या मनानं..दोघांनाही खूप बोलायचं होतं..खूप सांगायचं होतं... पण संभाषणच अडलं होतं... ''किती थंडी आहे, नाही?''  आणि  ''हळूहळू वाढणारच आहे !''  या पलीकडे शब्द सरकत नव्ह्ते.
      ''उद्या किती वाजताची गाडी ?'' काहीतरी विचारायचं तसं ती विचारते.
तंद्रीतून जागं झाल्यासारखं तो उत्तरतो,  '' चारची. ''
      '' मी येऊ स्टेशनवर ? ''
      '' कशाला ?.... उगीच... सगळे असतील... ''
      '' मग आजच निरोप द्यायचा मी?''
      '' अगं, मी पुन्हा येईनच ना लवकर..''
      '' म्हणजे? परीक्षा अलीकडे आल्याएत? '' ती.
      '' नाही गं. परीक्षा झाल्यावरच... नेहमीप्रमाणे...''
      '' म्हणजे अजून सहा महिने.! तिचा कापरा स्वर.
      '' हे बघ, तू असं बोललीस तर माझा अभ्यास होणार नाही.'' तो.
      ''................'' तिचं मौन.
      '' आणि हो, मला दर आठवड्याला पत्र आलं पाहिजे हं तुझं. हॉस्टेलवर फोन घेता येत नाही !'' तो आर्जवून सांगतो.
      ती म्हणते, '' दर आठवड्याला नाही जमलं, तर?''
'' ते काही नाही !'' तो अधिकारानं सांगतो, '' नाहीतर माझं अभ्यासात लक्ष लागणार नाही....'' ती हसते अन् म्हणते, '' तूही पाठवशील ना ? का मला वाट पाहायला लावशील?''
'' पाठवीन. पण एखादेवेळी नाही जमलं तरी तू रागवायचं नाही..''
तिला माहीत असतं की तो पत्रातून हेच लिहिणार आहे ' रागावू नकोस, बरेच दिवसात लिहू शकलो नाही.....खूप सबमिशन होतं ...परीक्षाही जवळ येतेय्...'
      पुन्हा बांधावर ती भानावर येते..तो म्हणतो, '' चांदणं किती छान पडलंय् नं? चंद्र पहा किती सुंदर आहे ! मी गेलो ना, की तू रोज ह्या चंद्राकडे पाहात जा. मीही त्याचवेळी तिकडे चंद्राकडे पाहीन. हा चंद्र आपल्यामधे कॉमन. म्हणजे आपण शेजारीच उभे आहोत असे वाटेल. नाही का?''
'' पण चंद्र काही रोज नसतो... अमावास्या येतच असते.. तेव्हा ?... '' ती.
''तेव्हा अंधार हाच कॉमन फॅक्टर..गंमत आहे नं? '' तो तिची समजूत घालतो.
पुढे म्हणतो, '' बरं, उद्या मी जाणार ! आजच्या या चांदण्या रात्रीची आठवण राहील असं एखादं गाणं म्हण ना ...''
''नको, आसपास इतरही माणसं आहेत..'' तिचा मूड नसतो.
'' लांब बसलेली आहेत ती. लहान आवाजात म्हण पाहिजे तर..फक्त मला ऐकू येईल असं...''
ती संकोचते. खांद्यावरचा त्याच्या हाताचा स्पर्श तिला आग्रह करतो. आणि त्या ऊबदार क्षणी तिचे स्वर उमटतात...
      ''  रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला
         आज चांदनी की नगरी में अरमानों का  मेला....''
पण ती रात्र काही थांबणार नसते... आणि तो चंद्रही....!
काळही थांबणार नसतो....ते शंकर-जयकिशन...ती मीनाकुमारी, राजेन्द्रकुमार..राजकुमार ......सगळयांवर कधीच काळाचा पडदा पडला...
      पण असे कित्येक ''तो आणि ती'' आहेत ज्यांच्या मनात त्या सुरांचं एक शिल्पित मंदिर कायमचं उभारलं गेलंय्...दिल एक मंदिर...  

                                          संगीता जोशी.
---------------------------------------------------------------------------------------        



Monday, June 17, 2013

एक अनुभव              
                   ----- संगीता जोशी
काल माझी एका तरुण मुलीशी गाठ पडली. तिचं कॉलेज, अभ्यास अशा तिच्या वयाला साजेशा गो॑ष्टींबद्दल बोलणं झालं. मुलगी ओळखीचीच होती. विशीच्या उंबरठ्यावरची. मला कुतूहल होते की आजकालचे तरुण देव, आध्यात्म इत्यादि विषयांसंबंधी काय विचार करतात? म्हणून मी सहज तसा विषय काढला. ती म्हणाली, ‘थांबा; आधी कालच घडलेली एक गोष्ट सांगते. काल मी कॉलेजजवळून पायी चालत जात असतांना रस्त्यावर एक आई व तिची मुलगी खेळ करत होते. ती मुलगी पाच सहा वर्षांची असेल; ती कोलांट्या उड्या मारत होती आई डफावर काडी घासून काहीतरी आवाज काढत होती.’
मी म्हटलं, ‘ते डोंबारी असतील’.
तो  शब्दही तिच्या परिचयाचा नव्हता ! इंग्रजी मीडियम ना !
‘पुढे काय झालं?’ मी विचारलं.
ती सांगत राहिली अन् मी स्तब्ध ऐकत राहिले. ती म्हणाली,
‘ब-याच कोलांट्या मारून झाल्या.तोपर्यंत बरीच गर्दी झाली होती. मग ती मुलगी जमलेल्या लोकांकडून पैसे मागू लागली. विनवणी करणारे लाचार भाव तिच्या चेह-यावर होते. ती सगळ्यांपुढे हात पसरत होती. पण कोणीच तिला पैसे देत नव्हतं. मला वाटलं की  मी तिला काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणून मी सॅकमधून काढून हाताला येतील तेवढे पैसे दिले. ते फार नसतील. पण ब-यापैकी होते. ती माझ्याकडे बघून खूप गोड हसली. अगदी तोंडभरून हसली.  मी पण हसले.. माझ्या आसपासची लोकंही हसत होती. त्या मुलीला जो आनंद झाला होता ना, त्यामुळे मला खूप आनंद झाला. तिचा आनंद पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि मला जाणवलं की ते आनंदाश्रू होते ! मुलगी आणि आई जायला निघाल्या. ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, ‘बाय् दीदी’ ! मी पण बाय म्हणाले. बाय करतांना तिनं माझ्याकडे पाहिलं ना, त्यात मला देव दिसला ! तिच्या डोळ्यात ! मला वाटतं, समोरच्या माणसात देव पाहाणं हेच आध्यात्म !’
ती विशीतली तरुणी बोलत होती न् मी अवाक् होऊन ऐकत होते ! आपण मागच्या पिढीतली माणसं नेहमी तक्रार करत असतो, की हल्लीची पिढी संवेदनाशून्य आहे; तंत्रज्ञाना च्या आहारी गेलेली आहे; उथळ विचारांची आहे....वगैरे. पण ह्या मुलीनं तरी ते  तेव्हा खोटं ठरवलं. मला खूप बरं वाटलं. कारण आशेचा एक किरण मला तिनं दाखवला होता. मी न राहवून तिचं कौतुक केलं. ‘तुला आध्यात्माचा अर्थ नक्कीच कळला आहे. या वयातही! ब-याच लोकांना मोठ्या वयातही हे कळत नाही ! तुझ्या आईनं तुझ्यावर केलेले संस्कारच हे बोलत आहेत.’
 रात्री मीसुध्दा आनंदात झोपी गेले.....आपली मतं याही वयात बदलली पाहिजेत..नवी पिढीही गहन विचार करू शकते हेच मनाला सुखवत होतं !!
------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, May 30, 2013

Ek UnmaLNe.

एक उन्मळणं...

एखादं जुनं,रुंद खोडाचं घेरदार आणि उंच वाढलेलं झाड एक दिवस अचानक मुळापासून उन्मळतं; विजा चमकल्यासारखा काड् काड् आवाज होतो आणि ते कोसळतं ! जमिनीला कडकडून भेटतं ......
लोक आश्चर्य करतात, ‘ इतकं जुनं,इतकं भक्कम झाड उन्मळलं? विश्वास बसत नाही. कालपर्यंत कधी वाटलं नाही की उद्याच हे पडेल म्हणून !...पण किती उजाड वाटतंय्..ही जागाही भकास वाटतेय्...’
का घडत असेल असं ? झाड काही सांगू शकत नाही; पण त्याचं कोसळणं ही काही एक दिवसाची प्रक्रिया नक्कीच नाही. त्या दिवसाच्या कितीतरी काळ आधीपासून ते आतून ‘जळत’ असलं पाहिजे.पोखरलं जात असलं पाहिजे. त्याला आधार देणारी मुळं ज्या मातीत गेलेली असतात, त्या मातीची रोज धूप होत असते; मुळं उघडी पडलेली असतात; आधार सुटत असतो; पण ते बिचारं कसंतरी तग धरून असतं. रीतीप्रमाणे नव्या ऋतूचं स्वागत  करत फुलत असतं. गाभ्यातलं जळणं लपवून नवनवी पोपटी पालवी धारण करत हसत असतं. उघड्या पडलेल्या मुळांकडे पाहात स्वतःशीच हसत असतं. त्याला कळलेलं असतं की आता ते फार तग धरू शकणार नाही ! पण ही पक्ष्यांची नवी घरटी इथं वसली आहेत, त्यांचं काय? त्या पक्ष्यांचा संसार होईपर्यंत तग धरता येणार आहे ? उन्मळणं थोपवता येणार आहे ?
.........आणि तो दिवस येतोच ! कारण तग धरणं झाडाच्या हातात नसतं. म्हणून ते कोसळतंच. मघाशी सांगितलं तसं. ज्या जमिनीनं त्याला ‘जीवन’ दिलं त्याच धरणीच्या चरणी ते माथा टेकतं....
बुंध्याचा छेद लोकांच्या नजरेला पडतो. त्यांच्यात चर्चा होते; ते म्हणतात, ‘ आतून गाभ्याला कसं काळं झालं आहे पाहा. पण हे आतून कसं जळलं? वीज पडली म्हणावं तर बाहेरून ठीक दिसतंय्. विजेच्या तारा गेल्याहेत जवळून! त्यामुळे तर असं झालं नसेल ? पण पाहा ना; आतून एवढं पोखरलं गेलंय् तरी खूप तग धरला म्हणायचा. आतली कीड पाहता, ह्याआधीच उन्मळायला हवं होतं...!’ अनेकांचे अनेक तर्क !!
त्यांना कशी कळणार होती झाडानं जगण्याची केलेली पराकाष्ठा? जळत राहूनही फुलत राहण्याची किमया करण्यासाठी केलेली साधना? कुणाला कळणार होती ?
आता फक्त म्युनिसिपालिटीचा डंपर येण्याचीच वाट बघायची होती....बस् !
                                                                                                                              संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------



Saturday, May 18, 2013


माझे वडील रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांना खूप मान होता. ते स्वतःही गात असत ,वाद्ये वाजवीत असत. मैफली ऐकायला जात असत.. त्यावर परीक्षणं लिहीत असत...एकूणच आमच्या घरात (माहेरच्या) संगीतमय वातावरण असे. संगीताबद्दल बोलणं, संगीत ऐकणं, चर्चा करणं, घरी छोट्या बैठकी करणं....यातच आम्ही रममाण असायचो... घरी संगीत-प्रेमींचा राबता असायचा.... एखाद्या धबधब्याखाली उभं राहिल्यावर सचैल भिजायला होईलच ना! तशी मी संगीतात चिंब झालेली असायची...लहानपणापासूनच ! मी टीन-एज मधे होते तेव्हापासून,किंबहुना त्याही आधीपासूनच, मी वडिलांबरोबर मैफलींना जात असे..दर शनिवारी असे कार्यक्रम असतच. मीही दहा वर्षांची असल्यापासून संगीत शिकतच होते. माझे पहिले शिक्षण धुळ्याच्या श्रीपाद रामचंद्र नाईकसर यांचेकडे झाले होते. गाणी ऐकून कान ‘तयार’ व्हायला पाहिजेत, असे माझे वडील सांगत व त्यांच्याबरोबर मैफलींना नेत.
माझे सद् भाग्य असे की पं.भीमसेन जोशींसारखे गायक मी तेव्हापासून ऐकले.. तेव्हा ते उदयाला येत होते. सवाई गंधर्वांचे जावई डॉ.व्ही.एस. देशपांडे (त्यांचे नावही वसंतरावच होते) हेही वडिलांचे मित्रच !  अष्टपैलू गायक वसंतराव देशपांडे (राहुल चे आजोबा ) हेही बैठकीतले. ह्या सर्वांची गाणी मी वडिलांसह भरभरून ऐकली. गाणे समजू लागले होते. त्यातील बारकाव्यांचा  आस्वाद कसा घ्यायचा हे वडील सांगत असत. तंबोरे लावण्यापासून, तबला व हार्मोनियमची साथ कशी लक्ष देऊन ऐकावी याचंसुध्दा ते स्पष्टीकरण करत असत..... आज कळतंय् की त्यांनी रसिकतेच्या आनंदाची, अलीबाबाची गुहाच माझ्यापुढे उघडून दिली होती !
त्याकाळात भीमसेनजींच्या मैफली सतत होत असत. म्हणजे हिमालय तेव्हा घडत होता ! आणि तो घडतांना बघण्याचं भाग्य मला लाभलं !! पुण्याच्या टिळक रोडवर त्यावेळी ‘राम एजन्सी’ नावाचं मोठं शॉप होतं. बहुधा वाहनांचं. शनिवारी रात्री तो हॉल मोकळा केला जायचा; आणि मैफलीसाठी जागा व्हायची. काही शनिवारी, त्यावेळचे डीएसपी कागल यांच्या बंगल्यावरही भीमसेनजींचं गाणं व्हायचं. सौ.सीता कागलही गायिका होत्या. त्या सर्व मैफली आजही आठवतात....ते सोन्याचे दिवस ....
अशीच एकदा राम एजन्सीमधे भीमसेनजींची मैफल होती. माझे वडील रात्री नऊ वाजताच गेले होते. मात्र, काही कारणाने मी त्यांच्याबरोबर गेले नव्हते. मैफल 10 वाजता सुरू झाली. तब्बल सव्वा तास भीमसेनजींनी शुध्द-कल्याण म्हटला. त्यानंतर त्यांचे नेहमीचे आवडते नाट्यगीत व नंतर मध्यंतर झाला. माझ्या वडिलांनी कोणाची तरी सायकल मागून घेतली व ते तडक घरी आले. मला झोपेतून उठवून जागे केले व म्हणाले,
‘ ऊठ;ऊठ ! भीमसेनचा आवाज काय लागला आहे आज ! झोपू नको; आवर आणि चल !!’
मीही लगेच तयार होऊन राम एजन्सीत पोहोचले. तंबोरे लावणं चालूच होतं. त्यांचा सुरेल गुंजारव सुरू झाला तेव्हाच कळलं की आता माझा आवडता ‘आभोगी’ राग ऐकायला मिळणार. म्हणजे पर्वणीच ! अशी त्या दिवसाची आठवण मनात घर करून राहेली आहे.  माझ्यावर रसिकतेचे संस्कार करून त्यांनी जे उपकार केले त्याला तोड नाही.......
********************************************************************************

Sunday, May 12, 2013


रुपेरी पडद्यावरची ‘ट्रजिडी क्वीन’ मीनाकुमारी आठवतेय् ? जुन्या परिणीता मधली ? अशोककुमारवर मूक प्रेम करणारी ! सिनेमाभर दुःख सहन करणारी ! खूपशा सिनेमांमधून ती स्वतः रडायची आणि प्रेक्षकांना रडवायची. म्हृणजेच उत्तम अभिनय करायची. दिसायचीही छान. तिचा शेवटचा सिनेमा होता ‘पाकीजा’. मला आठवतंय्, पूर्वीच्या पुण्यात डेक्कन जिमखान्यावर ‘हिंदविजय’ नामक त्यावेळचं शानदार थिएटर होतं. तिथं पाकीजा लागला होता. आम्ही मीनाकुमारीचे ‘फॅन’, तो बघायला गेलो होतो. सिनेमा एकदम मधेच थांबला आणि पडद्यावर पाटी आली, ‘मीनाकुमारी यांचे आजच अमुक वाजता दुःखद निधन झाले’ !
आम्हीही  दुःखात बुडालो व अश्रू गाळतच पुढचा सिनेमा बघितला होता...
ती मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होती. तिचं काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी तिला व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात. तिच्या शायरीतही दुःखाची झलक पाहायला मिळते.
हे दोन शेर वाचा----
            आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
            जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
                  हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
                  हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....
ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला( विश्वास)  बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी ‘अधूरी’ राहिली तरी चालेल !
दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
-----हृदयाचे झालेले तुकडेही हसत हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....
हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण ! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...
प्रेमाची अपेक्षा करता येईल असं एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!                संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------  

Tuesday, May 7, 2013


प्रेम.....एक उलटा विचार...
तुलसी ऐसी प्रीत न करियो  जैसे पेड खजूर
धूप लगे छाया नहीं, भूख लगे फल दूर.....
            -----संत तुलसीदास
तुलसीदासांच्या मते प्रीतीला काहीच अर्थ नाही. प्रीती ही खजुराच्या झाडाप्रमाणे आहे.... ते म्हणतात, ऊन लागतं आहे म्हणून ते झाड सावली देतं का?.....उत्तर—‘नाही.’  बरं; भूक लागलीए म्हणावं तर त्याची फळं तरी खायला मिळतात का?...उत्तर...’नाही!’ सावली नाही, कारण खजूराचं झाड एवढं उंच असतं की त्याची सावली जमिनीवर पडतच नाही ! तसंच ते उंच असल्यामुळे फळांपर्यंत हात पोहोचतच नाही...! म्हणूनच प्रीतीला त्यांनी खजुराची उपमा दिली.. आणि प्रेम करूच नका असा सल्ला देखील दिला.
एकीकडे, जग प्रेमावरच चालतं, प्रेमाशिवाय मानव-जन्म व्यर्थ आहे असं म्हटलं जातं; त्याचीच ही दुसरी बाजू ! तसंही प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच ना ! मग, माणसा-माणसातील प्रेमाच्या ह्या दुस-या बाजूचाही विचार करून पाहू. तसे करायला काय हरकत आहे?
तुलसीदासांच्या मते प्रेमाला अर्थ नाही, असं म्हणण्यापेक्षा, तुलसीदास विज्ञान(सायन्स) जाणत होते असं म्हणणं जास्त योग्य होईल. म्हणूनच तर त्यांना प्रेमासाठी खजूराच्या झाडाची उपमा सुचली !!
प्राणिमात्रांमध्ये,म्हणून माणसातही, नर-मादींमध्ये असणारं आकर्षण ही एक निसर्गदत्त बाब आहे, ती एक सहजप्रवृत्ती आहे; instinct आहे. प्रजोत्पादन व्हावं, वंशसातत्य टिकावं हा जीवशास्त्रीय(biological)उद्देश त्यामागे असतो. एखाद्या जातीची जपणूक करण्यासाठी प्राण्यांवर सोपविलेली ती एक नैसर्गिक जबाबदारी. अस्तित्त्व टिकविण्यासाठी असलेली एक तात्पुरती नैसर्गिक गरज. ह्या आकर्षणाला प्रेम हे नाव देऊन त्याचा फारच बोलबाला व उदोउदो केला जातो. कथा, कादंब-या,चित्रपट अशा सर्वच बाजूंनी त्या सहजप्रवृत्तीचं उदात्तीकरण केलं जातं. इथंच तरुणांची फसगत होते. त्या वयात असलेल्या शारीरिक आकर्षणालाच तरुणवर्ग प्रेम हे काहीतरी भव्य-दिव्य, उच्च-उदात्त असं समजून त्या मृगजाळामागे धावतात. पदरी बहुधा निराशाच येते. तशी ती आली की तरुणाई, अस्तित्त्वातच नसलेल्या ‘प्रेमाला’ बोल लावत बसतात. काही अतिसंवेदनशील (hypersensitive) व्यक्ती नैराश्य-अंधःकारातून बाहेरही येऊ शकत नाहीत. कधी जीवनही संपवतात.
प्रेम, हे नैसर्गिक गरजांचंच दुसरं नाव आहे हे समजून घ्यायला हवं.यातून कुठलंही नातं वगळता येणार नाही ! लहान मुलाची आईकडे ओढ असते.यालाही कारण आहे. ती त्याला दूध पाजते,सुरक्षितता देते, त्याच्या सर्व गरजा भागविते, म्हणूनच ते तिच्यावर अवलंबून राहातं. जसजशी ती गरज संपते, तसतसं ते सुटं होत जातं. मोठं झाल्यावर आईकडून त्याचं ‘प्रेम’ पत्नीकडे शिफ्ट होतं. कारण गरजा बदलतात.
आईला मुलाबद्दल वाटणारं प्रेम हे प्रेमाचं सर्वात उदात्त प्रेमाचं स्वरूप मानलं जातं. कारण ते निःस्वार्थ असतं. पण तोही एक स्वतःवरच्या प्रेमाचाच एक भाग असावा. कारण ते मूल तिच्या रक्ता-मासाचं असतं; आणि वेगळं झालेलं असलं तरी एकदा ते मूल तिच्याच शरीराचा हिस्सा असतं. पित्याला मुलाबद्दल वाटणारं प्रेमही त्याच कारणामुळे असावं. ‘हे मूल निर्माण होण्यास मी कारणीभूत आहे,ह्याच्या मातेच्या उदरात मी रुजविलेल्या बीजाचं हे फळ आहे; याच्या अस्तित्त्वानं मी माझं पौरुष सेध्द केलेलं आहे;’ अशा स्वकेंद्रित भावनेलाच तो अपत्यप्रेम नाव देत असावा. माता-अपत्य वा पिता-अपत्य ह्यांच्यामधील प्रेमाचं हे अतिशय परखड व स्पष्ट (किंवा naked) असं विश्लेषण आहे. इतर नात्यांच्या बाबत तर प्रेम ह्या भावनेचा विचारही करावासा वाटत नाही.
इतरांबरोबर असलेले प्रेमाचे संबंध हे वेगवेगळ्या प्रकारे गरजमूलकच असतात. प्रत्येक नात्यात ‘मी’ चा कुठला तरी, सुप्त मनाच्या पातळीवरचा स्वार्थ असतो. विचार करा; समजा, तुमचा एखादा चांगला मित्र, काही काळानंतर तुमची रोज निर्भत्सना करू लागला, तुमच्या मानसिक स्वास्थ्याला धक्के देऊ लागला,तर तुम्ही त्याला नक्कीच टाळाल; व पुढे जाऊन त्याचा तिरस्कार करू लागाल. मग जर इतके दिवस तुम्हा दोघांमधे  प्रेम होतं, ते कुठे गेलं ? खरं तर तसं प्रेम नसतंच. मैत्रीची भूक, समवयस्कांच्या सहवासाची भासणारी गरज व त्यातून मिळणारा आनंद; तो आनंद आपल्याला हवा असतो. ती आपली गरज असते. तीच दोघे मित्र भागवत असतात. फक्त त्या गरजेला गोंडस नाव मिळतं प्रेम !
म्हणूनच, खरं प्रेम जगात नाहीच !! असते ती फक्त एकमेकांची गरज. ती पूर्ण होत नाही असं दिसलं की माणसं एकमेकांपासून अलग होतात. तसं होतांना मग कुठलीही रेशमी बंधनं आड येत नाहीत; गाठी सैलावतात; सुटूनही जातात. मग नदीच्या प्रवाहातल्या दोन ओंडक्यांची उपमा देऊन किंवा बिरबलाने सांगितलेली माकडीण व तिच्या पिल्लाची गोष्ट पुढे करून माणसं प्रेम ही गोष्ट अस्तित्वातच नसल्याची कबुली देऊन टाकतात. आश्चर्य हे, की हीदेखील माणसाची सहजप्रवृत्तीच असते !!   
प्रेमाची ही दुसरी व उलट बाजू तुम्हाला कशी वाटली ?
                                    ------  संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------


Sunday, May 5, 2013


उपेनने आज जुनी गाणी आय्-पॅड वर ऐकविली..आणि I went down the memory lane…!
ते स्वाभाविकच होतं...गाणं होतं –कैसे दिन बीते, कैसे बीतीं रतियां, पिया जाने ना...अनुराधा या जुन्या सिनेमातलं... लीला नायडू व बलराज साहानी... भारतरत्न रविशंकर यांचं संगीत..शैलेन्द्रचे शब्द... लताचा आवाज...
....तो काळ होता, जेव्हा माझा आवाज खूप छान होता...मी हिंदी-मराठी लोकप्रिय गाणी भावपूर्ण अशी म्हणत असे...तेव्हा टेप-रेकॉर्डर वगैरे साधनं नव्हती..त्यामुळे लोक ..मित्र-मैत्रिणी नेहमी मला गाणी म्हणायला सांगत...गाणी ऐकण्याचा दुसरा मार्ग नसे....म्हणून मला ‘भाव’ मिळायचा...     
मला आठवतंय्, मी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला होते. तो आमचा सेंड-ऑफ चा दिवस होता.  आम्ही सर्व मुले-मुली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या झूलॉजी डिपार्टमेंट मधे जमलो होतो.आम्हाला शिकवणारे बरेच प्राध्यापकही होते.. मुला-मुलींची व त्यांचीही भाषणे झाली..डिश देण्याआधी अचानक एक मुलगा(नाव आता आठवत नाही) उभा राहिला, व त्याने घोषणा केली, ‘ आता आपल्या वर्गाच्या ‘लतामंगेशकर’ रजनी देशपांडे या एक गाणं सादर करतील..’...मला अगदी अनपेक्षित होतं... पण असे प्रसंग परिचयाचे होते...तेव्हा मी हेच गाणं म्हटलं होतं. जे उपेन ने ऐकवलं..
कैसे दिन बीते, कैसे बीतीं रतियां...पिया जाने ना
      नेहा लगाके मैं पछताई..सारी सारी रैना निंदिया ना आई..
      जानके देखो मेरे जीकी बतियॉं, पिया जाने ना....
      रुत मतवारी आके चली जाए..मनमें ही मेरे मनकी रही जाए
      खिलनेको तरसे नन्हीं नन्हीं कलियॉं... पिया जाने ना...
      कजरा ना सोहे, गजरा ना सोहे.. बरखा ना भाए, बदरा ना सोहे..
       क्या कहूं जो पूछे, मोसे मोरी सखियॉं..पिया जाने ना...

पूर्ण गाणं आठवलं; पण शेवटच्या ओळीला अडलेच !...हे अडणं नव्हे; हे अडखळणं आहे....ठेच लागणं आहे... कुठे गेला तो आवाज? कुठे गेलं ते हुबेहुब लताची नक्कल करण्याचं कसब? सगळ्यांना आनंद देणारे ते क्षण? त्यांच्या कौतुकानं ‘भरून पावल्याचं’ ते समाधान? कुठे गेलं माहीत नाही ; पण गेलं... माझा आवाज जायला नको होता.. माझं संगीत जायला नको होतं... खूप वाईट वाटतं... देवानं दिलेली आवाजाची ठेव मला जपता आली नाही.... आता त्याच्याकडे परत जाण्याचे दिवस आले...त्याने विचारलं तर काय सांगू...?
जुन्या गाण्यांच्यामागे अशा खूप कथा आहेत... माझ्या आठवणीत... त्या निदान अशा लिहून ठेवल्या तर तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी..!