उपेनने आज जुनी गाणी आय्-पॅड वर ऐकविली..आणि I went down the memory lane…!
ते स्वाभाविकच होतं...गाणं होतं –कैसे दिन बीते, कैसे बीतीं रतियां, पिया जाने
ना...अनुराधा या जुन्या सिनेमातलं... लीला नायडू व बलराज साहानी... भारतरत्न
रविशंकर यांचं संगीत..शैलेन्द्रचे शब्द... लताचा आवाज...
....तो काळ होता, जेव्हा माझा आवाज खूप छान होता...मी हिंदी-मराठी
लोकप्रिय गाणी भावपूर्ण अशी म्हणत असे...तेव्हा टेप-रेकॉर्डर वगैरे साधनं
नव्हती..त्यामुळे लोक ..मित्र-मैत्रिणी नेहमी मला गाणी म्हणायला सांगत...गाणी
ऐकण्याचा दुसरा मार्ग नसे....म्हणून मला ‘भाव’ मिळायचा...
मला आठवतंय्, मी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला होते. तो
आमचा सेंड-ऑफ चा दिवस होता. आम्ही सर्व
मुले-मुली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या झूलॉजी डिपार्टमेंट मधे जमलो
होतो.आम्हाला शिकवणारे बरेच प्राध्यापकही होते.. मुला-मुलींची व त्यांचीही भाषणे
झाली..डिश देण्याआधी अचानक एक मुलगा(नाव आता आठवत नाही) उभा राहिला, व त्याने
घोषणा केली, ‘ आता आपल्या वर्गाच्या ‘लतामंगेशकर’ रजनी देशपांडे या एक गाणं सादर
करतील..’...मला अगदी अनपेक्षित होतं... पण असे प्रसंग परिचयाचे होते...तेव्हा मी
हेच गाणं म्हटलं होतं. जे उपेन ने ऐकवलं..
कैसे दिन बीते, कैसे बीतीं रतियां...पिया जाने
ना
नेहा लगाके मैं
पछताई..सारी सारी रैना निंदिया ना आई..
जानके देखो मेरे
जीकी बतियॉं, पिया जाने ना....
रुत मतवारी आके
चली जाए..मनमें ही मेरे मनकी रही जाए
खिलनेको तरसे
नन्हीं नन्हीं कलियॉं... पिया जाने ना...
कजरा ना सोहे,
गजरा ना सोहे.. बरखा ना भाए, बदरा ना सोहे..
क्या कहूं जो पूछे, मोसे मोरी सखियॉं..पिया जाने
ना...
पूर्ण गाणं आठवलं; पण शेवटच्या ओळीला अडलेच !...हे अडणं
नव्हे; हे अडखळणं आहे....ठेच लागणं आहे... कुठे गेला तो आवाज? कुठे गेलं ते
हुबेहुब लताची नक्कल करण्याचं कसब? सगळ्यांना आनंद देणारे ते क्षण? त्यांच्या
कौतुकानं ‘भरून पावल्याचं’ ते समाधान? कुठे गेलं माहीत नाही ; पण गेलं... माझा
आवाज जायला नको होता.. माझं संगीत जायला नको होतं... खूप वाईट वाटतं... देवानं
दिलेली आवाजाची ठेव मला जपता आली नाही.... आता त्याच्याकडे परत जाण्याचे दिवस
आले...त्याने विचारलं तर काय सांगू...?
जुन्या गाण्यांच्यामागे अशा खूप कथा आहेत... माझ्या
आठवणीत... त्या निदान अशा लिहून ठेवल्या तर तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी..!
No comments:
Post a Comment