प्रेम.....एक
उलटा विचार...
तुलसी ऐसी प्रीत न करियो जैसे पेड खजूर
धूप लगे छाया नहीं, भूख लगे फल
दूर.....
-----संत तुलसीदास
तुलसीदासांच्या मते प्रीतीला
काहीच अर्थ नाही. प्रीती ही खजुराच्या झाडाप्रमाणे आहे.... ते म्हणतात, ऊन लागतं
आहे म्हणून ते झाड सावली देतं का?.....उत्तर—‘नाही.’ बरं; भूक लागलीए म्हणावं तर त्याची फळं तरी
खायला मिळतात का?...उत्तर...’नाही!’ सावली नाही, कारण खजूराचं झाड एवढं उंच असतं
की त्याची सावली जमिनीवर पडतच नाही ! तसंच ते उंच असल्यामुळे फळांपर्यंत हात
पोहोचतच नाही...! म्हणूनच प्रीतीला त्यांनी खजुराची उपमा दिली.. आणि प्रेम करूच
नका असा सल्ला देखील दिला.
एकीकडे, जग प्रेमावरच चालतं,
प्रेमाशिवाय मानव-जन्म व्यर्थ आहे असं म्हटलं जातं; त्याचीच ही दुसरी बाजू ! तसंही
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच ना ! मग, माणसा-माणसातील प्रेमाच्या ह्या दुस-या
बाजूचाही विचार करून पाहू. तसे करायला काय हरकत आहे?
तुलसीदासांच्या मते प्रेमाला
अर्थ नाही, असं म्हणण्यापेक्षा, तुलसीदास विज्ञान(सायन्स) जाणत होते असं म्हणणं
जास्त योग्य होईल. म्हणूनच तर त्यांना प्रेमासाठी खजूराच्या झाडाची उपमा सुचली !!
प्राणिमात्रांमध्ये,म्हणून माणसातही,
नर-मादींमध्ये असणारं आकर्षण ही एक निसर्गदत्त बाब आहे, ती एक सहजप्रवृत्ती आहे; instinct आहे. प्रजोत्पादन
व्हावं, वंशसातत्य टिकावं हा जीवशास्त्रीय(biological)उद्देश त्यामागे असतो. एखाद्या जातीची जपणूक
करण्यासाठी प्राण्यांवर सोपविलेली ती एक नैसर्गिक जबाबदारी. अस्तित्त्व
टिकविण्यासाठी असलेली एक तात्पुरती नैसर्गिक गरज. ह्या आकर्षणाला प्रेम हे नाव
देऊन त्याचा फारच बोलबाला व उदोउदो केला जातो. कथा, कादंब-या,चित्रपट अशा सर्वच
बाजूंनी त्या सहजप्रवृत्तीचं उदात्तीकरण केलं जातं. इथंच तरुणांची फसगत होते. त्या
वयात असलेल्या शारीरिक आकर्षणालाच तरुणवर्ग प्रेम हे काहीतरी भव्य-दिव्य, उच्च-उदात्त
असं समजून त्या मृगजाळामागे धावतात. पदरी बहुधा निराशाच येते. तशी ती आली की
तरुणाई, अस्तित्त्वातच नसलेल्या ‘प्रेमाला’ बोल लावत बसतात. काही अतिसंवेदनशील (hypersensitive) व्यक्ती
नैराश्य-अंधःकारातून बाहेरही येऊ शकत नाहीत. कधी जीवनही संपवतात.
प्रेम, हे नैसर्गिक गरजांचंच
दुसरं नाव आहे हे समजून घ्यायला हवं.यातून कुठलंही नातं वगळता येणार नाही ! लहान
मुलाची आईकडे ओढ असते.यालाही कारण आहे. ती त्याला दूध पाजते,सुरक्षितता देते,
त्याच्या सर्व गरजा भागविते, म्हणूनच ते तिच्यावर अवलंबून राहातं. जसजशी ती गरज
संपते, तसतसं ते सुटं होत जातं. मोठं झाल्यावर आईकडून त्याचं ‘प्रेम’ पत्नीकडे
शिफ्ट होतं. कारण गरजा बदलतात.
आईला मुलाबद्दल वाटणारं प्रेम हे
प्रेमाचं सर्वात उदात्त प्रेमाचं स्वरूप मानलं जातं. कारण ते निःस्वार्थ असतं. पण तोही
एक स्वतःवरच्या प्रेमाचाच एक भाग असावा. कारण ते मूल तिच्या रक्ता-मासाचं असतं;
आणि वेगळं झालेलं असलं तरी एकदा ते मूल तिच्याच शरीराचा हिस्सा असतं. पित्याला
मुलाबद्दल वाटणारं प्रेमही त्याच कारणामुळे असावं. ‘हे मूल निर्माण होण्यास मी
कारणीभूत आहे,ह्याच्या मातेच्या उदरात मी रुजविलेल्या बीजाचं हे फळ आहे; याच्या अस्तित्त्वानं
मी माझं पौरुष सेध्द केलेलं आहे;’ अशा स्वकेंद्रित भावनेलाच तो अपत्यप्रेम नाव
देत असावा. माता-अपत्य वा पिता-अपत्य ह्यांच्यामधील प्रेमाचं हे अतिशय परखड व स्पष्ट
(किंवा naked)
असं विश्लेषण
आहे. इतर नात्यांच्या बाबत तर प्रेम ह्या भावनेचा विचारही करावासा वाटत नाही.
इतरांबरोबर असलेले प्रेमाचे संबंध
हे वेगवेगळ्या प्रकारे गरजमूलकच असतात. प्रत्येक नात्यात ‘मी’ चा कुठला तरी, सुप्त
मनाच्या पातळीवरचा स्वार्थ असतो. विचार करा; समजा, तुमचा एखादा चांगला मित्र, काही
काळानंतर तुमची रोज निर्भत्सना करू लागला, तुमच्या मानसिक स्वास्थ्याला धक्के देऊ लागला,तर
तुम्ही त्याला नक्कीच टाळाल; व पुढे जाऊन त्याचा तिरस्कार करू लागाल. मग जर इतके दिवस
तुम्हा दोघांमधे प्रेम होतं, ते कुठे गेलं
? खरं तर तसं प्रेम नसतंच. मैत्रीची भूक, समवयस्कांच्या सहवासाची भासणारी गरज व त्यातून
मिळणारा आनंद; तो आनंद आपल्याला हवा असतो. ती आपली गरज असते. तीच दोघे मित्र भागवत
असतात. फक्त त्या गरजेला गोंडस नाव मिळतं प्रेम !
म्हणूनच, खरं प्रेम जगात नाहीच !! असते
ती फक्त एकमेकांची गरज. ती पूर्ण होत नाही असं दिसलं की माणसं एकमेकांपासून अलग होतात.
तसं होतांना मग कुठलीही रेशमी बंधनं आड येत नाहीत; गाठी सैलावतात; सुटूनही जातात. मग
नदीच्या प्रवाहातल्या दोन ओंडक्यांची उपमा देऊन किंवा बिरबलाने सांगितलेली माकडीण व
तिच्या पिल्लाची गोष्ट पुढे करून माणसं प्रेम ही गोष्ट अस्तित्वातच नसल्याची कबुली
देऊन टाकतात. आश्चर्य हे, की हीदेखील माणसाची सहजप्रवृत्तीच असते !!
प्रेमाची ही दुसरी व उलट बाजू तुम्हाला
कशी वाटली ?
------ संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment