Wednesday, May 1, 2013


घर...
घर....माणसाची गरज.एक मूलभूत गरज. रोटी-कपड्यांइतकीच. रोटीएवढी हे जास्त महत्त्वाचं.
कारण रोटीमुळे पोटाची भूक भागते. घरामुळे भावनिक भूकही शांत होत असावी...व्हायला पाहिजे.
तरच ते ‘घर’! दगड-माती..कॉंक्रीटचे ठोकळे म्हणजे का घर?House & Home यातील फरक शिक्षकांनी शाळेत कधीतरी समजावून सांगितला होता. पण त्या सर्व लहान वयात शिकलेल्या गोष्टींचा खरा अर्थ मोठ्या वयातच कळतो.
      घर ‘उभारण्यासाठी’ आपण काय काय म्हणून करत नाही? काही मिळविण्यासाठी आधी काही गमवावं तर लागतंच. सृष्टीचाच नियम आहे तसा. म्हणूनच त्याग हे मूल्य महत्त्वाचं आहे. घरासाठी नुसत्या विटा जोडून थोडंच भागतं? माणसं ‘जोडावी’ लागतात. घरातली माणसं एकसंध राहावीत यासाठी कुणीतरी एकानं मधल्या भेगा किंवा फटी भरण्यासाठी स्वतःला ठिकठिकाणी विखरून घ्यावं लागतं...स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व विसरावं लागतं...
      अशा उभारलेल्या घराकडून ते उभारणा-या व्यक्तीची काय अपेक्षा असते? किंबहुना अपेक्षा असावी की  नसावी? ....याचं आदर्श उत्तर ‘नसावी’ हेच असणार. खरं आहे. अपेक्षा ठेवूच नये, म्हणजे दुःख होत नाही. कारण अपेक्षा आली की अपेक्षाभंगाचं दुःखाचं आलंच ! आध्यात्मशास्त्र असंच सांगतं. पण ह्या गोष्टी पचवणं फार कठीण आहे. ही संताची तत्त्वं सामान्य माणसांच्या अंगवळणी सहज पडत नाहीत. नाहीतर सगळेच संत झाले असते. सामान्य माणसाला ‘अपेक्षा’ असतातच.
      आदिमानवानं संरक्षणासाठी ‘घर’ वसविलं असलं तरी आजच्या माणसाला त्याहून अधिक काहीतरी हवं असतं. घराकडून...त्यात त्याच्याबरोबर राहणा-या माणसांकडून प्रेम हवं असतं. भावनिक सुरक्षितता हवी असते. आदिमानवाच्या वेळी त्याच्याभोवती जंगली श्वापदं होती. आताही माणसाच्या सभोवती त्यापेक्षा वेगळ्या प्रकारची श्वापदं दबा धरून बसलेली असतात. स्पर्धा, अपयश, अपमान, नाकारलं जाणं, नापसंती....अशी केतीतरी ! मग... घरी माणसाला हवी असते ती आपुलकीची, प्रेमाची ऊब. सर्वात महत्त्वाची,जी घरी मिळावी अशी ती गोष्ट...emotional security..! ती जर नसेल तर? तर... मग घर म्हणजे विटांना...विटांवर केलेला गिलावा..!  किंवा ‘वीट’ झाकण्यासाठी त्यावर लावलेले ‘शोभिवंत’ थर !...चढवलेले रंग.... फक्त दिखाऊ सुशोभन !....
      एक कविता आहे......
      पुन्हा विटा..पुन्हा माती । पुन्हा बांधायाचे घर
      पुन्हा काळ्या बाहुलीस । टांगायाचे आढ्यावर ।।
      नव्या रंगसफेदीने । पुसायाचे ओरखडे
      मखमाली पडद्यांनी  । झुलायाचे मागेपुढे ।।
      कागदाच्या  फुलांनीही । पुन्हा व्हायचे सजीव
      कुठे जिवंतपणात । नको भासाया उणीव ।।
      चारी बिंतींनी द्यायचा । पुन्हा छतास आधार
      आणि ‘साफल्य’ नावाला । घालायचा पुष्पहार ...।।
ही कविता कोणाची आहे? ब्लॉग लिहिणा-या माझीच !      संगीता जोशी



No comments:

Post a Comment