हाय! हॅलो!! नमस्कार !! साईराम
!!!
ही आपली पहिलीच भेट. पहिलीच ओळख.
निदान ह्या माध्यमातून.पण पहिलेपणाच्या सर्व गोष्टी तपशीलासह निश्चितच आपल्या
लक्षात राहतात,नाही का? तुमचा काय अनुभव? हाच असणार.मला माहीतय्.उदाहरणार्थ पहिलं
प्रेम ! (म्हणजेच दुसरं,तिसरं...आयुष्यात येतच
असतं!!)तर, हे पहिलं वहिलं प्रेम. त्याबद्दलच मी आपल्या ह्या पहिल्या भेटीत बोलणार
आहे.माझ्या पहिल्या प्रेमाविषयी.....कान टवकारले ना?
......माझं पहिलं प्रेम म्हणजे गझल !! उर्दू असो, मराठी असो..मी
तिच्या प्रेमातच आहे... आणि मग ज्या चांगल्या गझला प्रिय होतात त्यांचे कवीही
हृदयाजवळ राहतात.माझी ज्या उर्दू कवीशी प्रथम ओळख झाली तो होता साहिर
लुधियानवी.त्यानं हिंदी सिनेमातली खूप गीतंही लिहिली.त्याची एक गझल ...तुम्हाला
माहीतही असेल ती.
मैं ज्ञिन्दगीका साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुएमें उडाता चला गया...1
देव आनंदची आठवण झाली ना?
त्याच्या सदाहरित व्यक्तिमत्वाइतकेच हे टवटवीत व अर्थपूर्ण शब्द...सोपं लिहिणं खूप
अवघड असतं म्हणतात. इतकं सोपं की ते सहज हृदयाला भिडतं.जे शब्द हृदयाला भिडतात त्याचे
प्रतिध्वनी मनात उमटत राहतात.माझ्याही मनात ते उमटलेत...मराठीत..
मी जीवनास मूक स्विकारीत राहिलो
चिंतेस फुंकरीवरी झटकीत राहिलो...1
हे मराठी शेरही मी त्याच चालीत
गुणगुणत राहिले.पुढचे तीन उर्दू शेर व त्यानंतरचे मराठी शेर वाचून बघा.
बर्बादियोंका सोग मनाना फिज्ञूल था
बर्बादियोंका जश्न मनाता चला गया...2
उद्ध्वस्त जाहलो न कधी खेद
मानिला
उद्ध्वस्त हाच उत्सव मानीत
राहिलो..2
गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां
मैं दिल को उस मकामपे लाता चला गया...3
सुखदुःख एकरूपच होते जिथे कुठे
मन मी तिथेच नेउन रमवीत
राहिलो...3
जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया...4
दैवास मान्य तेच ओंजळीत राहिले
जे लाभले न, सर्वच विसरीत
राहिलो...4
तिसर्या शेरात तर साहिरने
भ.गीतेतलं तत्वज्ञानच सांगितले आहे.
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
ततो युध्दाय युज्यस्व नैवं
पापमवाप्स्यसि
---सुख-दुःख.लाभ-हानी,जय-पराजय
याचा विचार न करताच जीवनाची लढाई लढली पाहिजे! कवी हा तत्वज्ञानीच असतो असे
म्हणतात ते उगीच नाही,पटलं?सिनेमाच्या गीतांखेरीज साहिरची इतर शायरीही वेड लावणारी
आहे. ज्या एका कवितेनं त्याच्या डोक्यावर मुकुट(ताज) ठेवला,ती कविता पुढल्या
भागात.....
(क्षमस्व!!उर्दूचे लेखन
उच्चारानुसार आहे व नुक्ते देणे अडचणीचे आहे, हे कृपया समजावून घ्यावे)
संगीता
जोशी.(मराठी कवयित्री-गझलकार)
No comments:
Post a Comment