माझे वडील रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे. शास्त्रीय संगीत
क्षेत्रात त्यांना खूप मान होता. ते स्वतःही गात असत ,वाद्ये वाजवीत असत. मैफली
ऐकायला जात असत.. त्यावर परीक्षणं लिहीत असत...एकूणच आमच्या घरात (माहेरच्या)
संगीतमय वातावरण असे. संगीताबद्दल बोलणं, संगीत ऐकणं, चर्चा करणं, घरी छोट्या
बैठकी करणं....यातच आम्ही रममाण असायचो... घरी संगीत-प्रेमींचा राबता असायचा....
एखाद्या धबधब्याखाली उभं राहिल्यावर सचैल भिजायला होईलच ना! तशी मी संगीतात चिंब
झालेली असायची...लहानपणापासूनच ! मी टीन-एज मधे होते तेव्हापासून,किंबहुना त्याही
आधीपासूनच, मी वडिलांबरोबर मैफलींना जात असे..दर शनिवारी असे कार्यक्रम असतच. मीही
दहा वर्षांची असल्यापासून संगीत शिकतच होते. माझे पहिले शिक्षण धुळ्याच्या श्रीपाद
रामचंद्र नाईकसर यांचेकडे झाले होते. गाणी ऐकून कान ‘तयार’ व्हायला पाहिजेत, असे
माझे वडील सांगत व त्यांच्याबरोबर मैफलींना नेत.
माझे सद् भाग्य असे की पं.भीमसेन जोशींसारखे गायक मी
तेव्हापासून ऐकले.. तेव्हा ते उदयाला येत होते. सवाई गंधर्वांचे जावई डॉ.व्ही.एस.
देशपांडे (त्यांचे नावही वसंतरावच होते) हेही वडिलांचे मित्रच ! अष्टपैलू गायक वसंतराव देशपांडे (राहुल चे आजोबा
) हेही बैठकीतले. ह्या सर्वांची गाणी मी वडिलांसह भरभरून ऐकली. गाणे समजू लागले
होते. त्यातील बारकाव्यांचा आस्वाद कसा
घ्यायचा हे वडील सांगत असत. तंबोरे लावण्यापासून, तबला व हार्मोनियमची साथ कशी
लक्ष देऊन ऐकावी याचंसुध्दा ते स्पष्टीकरण करत असत..... आज कळतंय् की त्यांनी
रसिकतेच्या आनंदाची, अलीबाबाची गुहाच माझ्यापुढे उघडून दिली होती !
त्याकाळात भीमसेनजींच्या मैफली सतत होत असत. म्हणजे हिमालय
तेव्हा घडत होता ! आणि तो घडतांना बघण्याचं भाग्य मला लाभलं !! पुण्याच्या टिळक
रोडवर त्यावेळी ‘राम एजन्सी’ नावाचं मोठं शॉप होतं. बहुधा वाहनांचं. शनिवारी
रात्री तो हॉल मोकळा केला जायचा; आणि मैफलीसाठी जागा व्हायची. काही शनिवारी, त्यावेळचे
डीएसपी कागल यांच्या बंगल्यावरही भीमसेनजींचं गाणं व्हायचं. सौ.सीता कागलही गायिका
होत्या. त्या सर्व मैफली आजही आठवतात....ते सोन्याचे दिवस ....
अशीच एकदा राम एजन्सीमधे भीमसेनजींची मैफल होती. माझे वडील
रात्री नऊ वाजताच गेले होते. मात्र, काही कारणाने मी त्यांच्याबरोबर गेले नव्हते. मैफल
10 वाजता सुरू झाली. तब्बल सव्वा तास भीमसेनजींनी शुध्द-कल्याण म्हटला. त्यानंतर
त्यांचे नेहमीचे आवडते नाट्यगीत व नंतर मध्यंतर झाला. माझ्या वडिलांनी कोणाची तरी
सायकल मागून घेतली व ते तडक घरी आले. मला झोपेतून उठवून जागे केले व म्हणाले,
‘ ऊठ;ऊठ ! भीमसेनचा आवाज काय लागला आहे आज ! झोपू नको; आवर
आणि चल !!’
मीही लगेच तयार होऊन राम एजन्सीत पोहोचले. तंबोरे लावणं
चालूच होतं. त्यांचा सुरेल गुंजारव सुरू झाला तेव्हाच कळलं की आता माझा आवडता ‘आभोगी’
राग ऐकायला मिळणार. म्हणजे पर्वणीच ! अशी त्या दिवसाची आठवण मनात घर करून राहेली आहे.
माझ्यावर रसिकतेचे संस्कार करून त्यांनी जे
उपकार केले त्याला तोड नाही.......
********************************************************************************
No comments:
Post a Comment