रुपेरी पडद्यावरची ‘ट्रजिडी
क्वीन’ मीनाकुमारी आठवतेय् ? जुन्या परिणीता मधली ? अशोककुमारवर मूक प्रेम करणारी
! सिनेमाभर दुःख सहन करणारी ! खूपशा सिनेमांमधून ती स्वतः रडायची आणि प्रेक्षकांना
रडवायची. म्हृणजेच उत्तम अभिनय करायची. दिसायचीही छान. तिचा शेवटचा सिनेमा होता
‘पाकीजा’. मला आठवतंय्, पूर्वीच्या पुण्यात डेक्कन जिमखान्यावर ‘हिंदविजय’ नामक
त्यावेळचं शानदार थिएटर होतं. तिथं पाकीजा लागला होता. आम्ही मीनाकुमारीचे ‘फॅन’,
तो बघायला गेलो होतो. सिनेमा एकदम मधेच थांबला आणि पडद्यावर पाटी आली, ‘मीनाकुमारी
यांचे आजच अमुक वाजता दुःखद निधन झाले’ !
आम्हीही दुःखात बुडालो व अश्रू गाळतच पुढचा सिनेमा
बघितला होता...
ती मीनाकुमारी एक शायरां (उर्दू
कवयित्री) सुध्दा होती. तिचं काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी
वरदान ठरणारी दुःखाची देणगी तिला व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं
म्हणतात. तिच्या शायरीतही दुःखाची झलक पाहायला मिळते.
हे दोन शेर वाचा----
आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....
ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी
सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी
पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत
नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला(
विश्वास) बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी
‘अधूरी’ राहिली तरी चालेल !
दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
-----हृदयाचे झालेले तुकडेही हसत
हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं
बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....
हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण
! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला
प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं
निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...
प्रेमाची अपेक्षा करता येईल असं
एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही
मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!
संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment