Showing posts with label Urdu Shayari. Show all posts
Showing posts with label Urdu Shayari. Show all posts

Wednesday, January 20, 2016




21 जानेवारी 2016.
आज एका आवडत्या विषयावर भाषण ऐकायला मिळालं. वक्ते होते डॉ.अक्षयकुमार काळे.
आणि विषय होता गालिब.प्रसिद्ध उर्दू शायर.200 हून अधिक वर्षे झाली पण अजुन त्याची शायरी वाचली जाते.त्यावर समीक्षा केली जाते. अाजच्या सारखी त्यावर भाषणेही दिली जातात.
मी सुद्धा गालिब वर लिहिले आहे...
दिले-नादॉं तुझे हुआ क्या है । आखिर इस दर्द की दवा क्या है ।।
हा शेर तर सगळ्यांनाच माहीत आहे. अर्थ असा की ---प्रेम केलं की वाट्याला येतं ते दुःखच.
ह्या प्रेमाच्या दुःखावर काहीच इलाज नाही का? मग अरे, माझ्या अविचारी (मूर्ख) हृदया, तुला झालंय तरी काय?
का तू प्रेमात पडला आहेस?
गालिब चे आणखीही शेर पुढच्या Blog मधे लिहीन.


Sunday, May 12, 2013


रुपेरी पडद्यावरची ‘ट्रजिडी क्वीन’ मीनाकुमारी आठवतेय् ? जुन्या परिणीता मधली ? अशोककुमारवर मूक प्रेम करणारी ! सिनेमाभर दुःख सहन करणारी ! खूपशा सिनेमांमधून ती स्वतः रडायची आणि प्रेक्षकांना रडवायची. म्हृणजेच उत्तम अभिनय करायची. दिसायचीही छान. तिचा शेवटचा सिनेमा होता ‘पाकीजा’. मला आठवतंय्, पूर्वीच्या पुण्यात डेक्कन जिमखान्यावर ‘हिंदविजय’ नामक त्यावेळचं शानदार थिएटर होतं. तिथं पाकीजा लागला होता. आम्ही मीनाकुमारीचे ‘फॅन’, तो बघायला गेलो होतो. सिनेमा एकदम मधेच थांबला आणि पडद्यावर पाटी आली, ‘मीनाकुमारी यांचे आजच अमुक वाजता दुःखद निधन झाले’ !
आम्हीही  दुःखात बुडालो व अश्रू गाळतच पुढचा सिनेमा बघितला होता...
ती मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होती. तिचं काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी तिला व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात. तिच्या शायरीतही दुःखाची झलक पाहायला मिळते.
हे दोन शेर वाचा----
            आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
            जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
                  हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
                  हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....
ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला( विश्वास)  बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी ‘अधूरी’ राहिली तरी चालेल !
दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
-----हृदयाचे झालेले तुकडेही हसत हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....
हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण ! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...
प्रेमाची अपेक्षा करता येईल असं एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!                संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------  

Friday, March 29, 2013

Sahir Ludhiyanvi


उर्दू शायर साहिर लुधियानवी हा शायरीच्या आभाळातला चमचमता तारा होता,पण त्याच्या वाट्याला आलेलं जीवनाचं आभाळ मात्र अंधःकारमय होतं.वडिलांनी आईला तलाक दिला, तो मात्र आईजवळच राहिला.गरिबीतही शिक्षण घेतलं. पण तेही अर्धवट सोडावं लागलं.
आयुष्यात प्रेम तर भेटलं पण लाभलं कधीच नाही.चुकून प्रेयसीकडून होकारार्थी उत्तर मिळालंच आणि तिनं भेटायला यायचं कबूल केलंच तर साहिरची एक छोटीशी अट आहे. तिची इच्छा आहे की 'प्रेमाचं चिरंतन प्रतीक' असलेल्या ताजमहलच्या साक्षीनं भेटावं.ते संकेतस्थळ साहिरला मात्र मान्य नाही. तो म्हणतो,
            ताज तेरेलिये इक मज्ञहरे उल्फत ही सही
            मेरी महबूब, कहीं और मिला कर मुझसे...
प्रिये, तुला हा ताजमहल म्हणजे प्रेमाचं द्योतक वाटत असेलही,पण तरीही आपण दुसरीकडे कुठेतरी भेटत जाऊ या.....
            अनगिनत लोगोंने दुनियामें मोहब्बत की है
कौन कहता है कि सादिक न थे जज्बे उनके  
           

लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं
            क्योंकि वो लोग भी अपनीही तरह मुफलिस थे....
---अगं ! जगात असंख्य लोकांनी प्रेम केलं आहे.कोण म्हणतं की त्यांचं प्रेम खरं नव्हतं?किंवा शाहजहॉं प्रमाणे उत्कट नव्ह्तं? पण काय आहे माहीतय् का?त्यांच्याजवळ त्या प्रेमाची 'जाहिरात' करण्याचं कुठलंही साधन नव्हतं.कारण ते लोक तुझ्या-माझ्यासारखे निर्धन होते...गरीब होते.
मेरी महबूब! उन्हें भी तो मोहब्बत होगी
जिनकी सन्नाई ने बख्शी है इसे शक्ले-जमील
उनके प्यारोंके मकाबिर रहे बेनामो-नमूद
आजतक उनपे  जलाई न किसीने किंदील....
---प्रिये, ज्या(कारागिरांनी) ह्या ताजमहलाला एवढं सुंदर रूप दिलं त्यांनीही तर कोणावर तरी प्रेम केलं असेलंच ना! त्यांच्याही प्रिय व्यक्तींच्या कबरी असतीलच कुठेतरी..सर्वांना अज्ञात, अशा जागी.कुणी दखलही घेत नसेल कबरींची, मग त्यावर एखादा दीप लावणं तर दूरच...
ये चमनजार,ये जमनाका किनारा,ये महल
ये मुनक्कश दरोदीवार, ये मेहराब,ये ताक  
इक शहेनशाह ने दौलतका सहारा लेकर
हम गरीबोंकी मोहब्बतका उडाया है मजाक...
मेरी महबूब कहींऔर मिला कर मुझसे.....
---यमुनेच्या तीरावरचं हे शाही उद्यान, हा ताजमहाल, ह्या नक्षीदार भिंती आणि महिरपी कमानी! केवढं वैभवशाली हे सगळं दृष्य! पण मला वाटतं,एका सम्राटानं संपत्तीचा आधार घेऊन ताज बांधून केवळ आपणां गरिबांची खिल्ली उडविली आहे, दुसरं काही नाही...म्हणूनच आपण दुसरीकडे कुठेतरी भेटू या....
ताजमहल या कवितेनं धमाल उडवून दिली व साहिर काव्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला.ताजमहलकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन आश्चर्याचा व त्याच्या सौंदर्यापुढे नतमस्तक होण्याचा असा होता. त्याला छेद देणारे व दुसरा पैलू मांडणारे विचार साहिरनं प्रथमच मांडले होते. त्यानंतर आणखीही कवींनी ताज वर कविता केल्या,पण साहिरच्या 'ताजमहल' ची सर कशालाही नाही. अशारीतीनं ताजमहल हे साहिरचंच स्मारक झालं आहे ! निदान काव्य-रसिकांपुरतं तरी !
आता तुम्ही ताजमहल पाहायला जाल तेव्हा तुम्हाला साहिरची आठवण होईलच,त्याचबरोबर त्या अज्ञात कारागिरांचीही होईल ना? होईलच, मला खात्री आहे!

तळागाळातल्या लोकांबद्दलही मनात करुणा बाळगण्याचा संदेश ही कविता देते, नाही का?
आज कॉलेज मध्ये जाणार्‍या मेघनाला जेव्हा ही कविता समजावून दिली,तेव्हा ती सुध्दा आश्चर्यचकित झाली व साहिर च्या प्रतिभेने दिपून गेली. महान साहित्य हे कालातीत असतं,हेच खरं ! !