उर्दू शायर साहिर लुधियानवी हा
शायरीच्या आभाळातला चमचमता तारा होता,पण त्याच्या वाट्याला आलेलं जीवनाचं आभाळ
मात्र अंधःकारमय होतं.वडिलांनी आईला तलाक दिला, तो मात्र आईजवळच राहिला.गरिबीतही शिक्षण
घेतलं. पण तेही अर्धवट सोडावं लागलं.
आयुष्यात प्रेम तर भेटलं पण
लाभलं कधीच नाही.चुकून प्रेयसीकडून होकारार्थी उत्तर मिळालंच आणि तिनं भेटायला
यायचं कबूल केलंच तर साहिरची एक छोटीशी अट आहे. तिची इच्छा आहे की 'प्रेमाचं
चिरंतन प्रतीक' असलेल्या ताजमहलच्या साक्षीनं भेटावं.ते संकेतस्थळ साहिरला मात्र
मान्य नाही. तो म्हणतो,
ताज
तेरेलिये इक मज्ञहरे उल्फत ही सही
मेरी महबूब, कहीं और मिला कर मुझसे...
प्रिये, तुला हा ताजमहल म्हणजे
प्रेमाचं द्योतक वाटत असेलही,पण तरीही आपण दुसरीकडे कुठेतरी भेटत जाऊ या.....
अनगिनत लोगोंने दुनियामें मोहब्बत की है
कौन
कहता है कि सादिक न थे जज्बे उनके
लेकिन
उनके लिए तशहीर का सामान नहीं
क्योंकि वो लोग भी अपनीही तरह मुफलिस थे....
---अगं ! जगात असंख्य लोकांनी
प्रेम केलं आहे.कोण म्हणतं की त्यांचं प्रेम खरं नव्हतं?किंवा शाहजहॉं प्रमाणे
उत्कट नव्ह्तं? पण काय आहे माहीतय् का?त्यांच्याजवळ त्या प्रेमाची 'जाहिरात'
करण्याचं कुठलंही साधन नव्हतं.कारण ते लोक तुझ्या-माझ्यासारखे निर्धन होते...गरीब
होते.
मेरी महबूब!
उन्हें भी तो मोहब्बत होगी
जिनकी सन्नाई
ने बख्शी है इसे शक्ले-जमील
उनके प्यारोंके
मकाबिर रहे बेनामो-नमूद
आजतक उनपे जलाई न किसीने किंदील....
---प्रिये, ज्या(कारागिरांनी)
ह्या ताजमहलाला एवढं सुंदर रूप दिलं त्यांनीही तर कोणावर तरी प्रेम केलं असेलंच
ना! त्यांच्याही प्रिय व्यक्तींच्या कबरी असतीलच कुठेतरी..सर्वांना अज्ञात, अशा
जागी.कुणी दखलही घेत नसेल कबरींची, मग त्यावर एखादा दीप लावणं तर दूरच...
ये चमनजार,ये
जमनाका किनारा,ये महल
ये मुनक्कश
दरोदीवार, ये मेहराब,ये ताक
इक शहेनशाह ने
दौलतका सहारा लेकर
हम गरीबोंकी
मोहब्बतका उडाया है मजाक...
मेरी महबूब
कहींऔर मिला कर मुझसे.....
---यमुनेच्या तीरावरचं हे शाही
उद्यान, हा ताजमहाल, ह्या नक्षीदार भिंती आणि महिरपी कमानी! केवढं वैभवशाली हे
सगळं दृष्य! पण मला वाटतं,एका सम्राटानं संपत्तीचा आधार घेऊन ताज बांधून केवळ
आपणां गरिबांची खिल्ली उडविली आहे, दुसरं काही नाही...म्हणूनच आपण दुसरीकडे
कुठेतरी भेटू या....
ताजमहल या कवितेनं धमाल उडवून
दिली व साहिर काव्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला.ताजमहलकडे पाहण्याचा सर्वसाधारण
दृष्टिकोन आश्चर्याचा व त्याच्या सौंदर्यापुढे नतमस्तक होण्याचा असा होता. त्याला
छेद देणारे व दुसरा पैलू मांडणारे विचार साहिरनं प्रथमच मांडले होते. त्यानंतर
आणखीही कवींनी ताज वर कविता केल्या,पण साहिरच्या 'ताजमहल' ची सर कशालाही नाही.
अशारीतीनं ताजमहल हे साहिरचंच स्मारक झालं आहे ! निदान काव्य-रसिकांपुरतं तरी !
आता तुम्ही ताजमहल पाहायला जाल
तेव्हा तुम्हाला साहिरची आठवण होईलच,त्याचबरोबर त्या अज्ञात कारागिरांचीही होईल
ना? होईलच, मला खात्री आहे!
तळागाळातल्या लोकांबद्दलही मनात
करुणा बाळगण्याचा संदेश ही कविता देते, नाही का?
आज कॉलेज मध्ये जाणार्या
मेघनाला जेव्हा ही कविता समजावून दिली,तेव्हा ती सुध्दा आश्चर्यचकित झाली व साहिर
च्या प्रतिभेने दिपून गेली. महान साहित्य हे कालातीत असतं,हेच खरं ! !
No comments:
Post a Comment