Sunday, September 22, 2024

 

     काल पुन्हा देव आहे की नाही याबद्द‍ल चर्वा झाली.

गिरिशभावजींनी  विचारलं आपण एकच देव का मानत नाही?

अल्ला व येशू हे जसे मुस्लिम व ख्रिश्चन यांचे सर्वांचे एकच देव आहेत, तसं आपलं का नाही?

मी म्हटलं देव म्हणजे प्रकाश ऊर्जा आहे...एकच परमेश्वर !

त्यालाच आपण वेगळी वेगळी नावं दिली आहेत, 

सोयीप्रमाणे, आवडीप्रमाणे...

आणि खरंच , ऊर्जांची रूपं ही निरनिराळी नाहीत का?

विद्युत, चुंबकीय, उष्णता, प्रकाश....इ. 

एकमेकात रूपांतरित होऊ शकतात, पण नाश होत नाहीत...

हाच देवाचा गुणधर्म नाही का? 

ऊर्जा दिसत नाही , पण तिचे परिणाम आपण अनुभवू शकतो...

तसंच देवाचं नाही का?

त्याची कृपा आपण अनुभवू शकतो... 

तो रागावत नाही, आपली कर्मे आपल्याला चांगली- वाईट फळे देत असतात.

वाईट फळांची तीव्रता आपण ईश्वर-कृपा संपादून, कमी करू शकतो...

22.9.2024

Sunday, September 8, 2024

 2020 ला शेवटची पोस्ट लिहिणार होते. 

आज चार वर्षं झाली, काहीच लिहिलं नाही...ही सगळी वर्षं केवळ आजारपणात गेली...

पॅरॅलिसिस, डेंग्यू, हर्पिस झोस्टर (नागीण) , त्यानंतर साएटिका, त्यानंतर हृदय ...! 

तेव्हा लिखाण शक्यच नव्हतं.

काल अचानक मोबाइलवर माझाच एक ब्लॉग समोर आला आणि वाटलं पुन्हा लिहावं...

कोणी वाचो; न वाचो.... आपल्यासाठी लिहावं...

या चार वर्षात एक चांगली गोष्ट झाली... महावतार बाबाजी माझ्या आयुष्यात आले...

यू-ट्यूबवर त्यांच्याबद्द‍ल खूप वाचलं ...पुस्तकं घेतली...स्वामींनी...सत्यसाईंनीच मला त्यांच्याकडे नेलं असं 

मी मानते.....पहाटे उठून साधना करू लागले आहे ...

5जुलै 24 ला पाल्पिटेशन मुळे मी शाश्वत हॉस्पिटल ला दाखल झाले...

त्यांनी मला  Anjioplasty करायला सांगितली !! 

बापरे ! मी घाबरले . माझी तयारी नव्हती. पण... 

तेवढ्यात एक दुसरे डॉक्टर एका दुसर्‍या पेशंटला बघायाल ICU मधे आले...

अगदी सहज ते माझ्या कॉट कडे आले....मी हकीगत सांगितली...

ते फाईल पाहून म्हणाले , 'काही गरज वाटत नाही मला ऑपरेशन ची . तुम्ही 

दीनानाथ ला सिफ्ट व्हा. मी तुम्हाला तपासतो...ऽ'

मी शिफ्ट झाले.... डॉ धोपेश्वरकर कार्डिऑलॉजिस्ट, त्यांनी तपासले, 

सगळ्या टेस्टस् पुन्हा केल्या....व    Anjio ची गरज नसल्याचे सांगितले...

मी या गटनेला बाबाजींची कृपाच समजते... कारण ते डॉक्टर कोणा दुसर्‍या 

पेशंटसाठी ााले होते...मी बोलावले नव्हते...

ते अचानक माज्याकडे कसे आले? फाइल का बघितली? व मला दुसरीकडे

का हलवले?  व कोणी माझी  Anjjiography v plasty टाळली? 

बाबाजींनीच ना ? 

 त्यांना शतशः वंदन !!! 



Wednesday, March 13, 2019

2019 उजाडूनही आता तीन महिने होत आले !,,,,
काळ पुढे सरकतो आहे...मागे पाहयला सवडच नाही..व पुढचं काही दिसत नाही...
पण मागचे आवाज येत राहतातच..
तिकडे दुर्लक्ष करणं हेच श्रेयस्कर. म्हातारपणात माणूस जुन्या आठवणीत जास्त रमू लागतो, असं पूर्वी वाचलंय...
 माझ्या बाबतीत असं झालंय, की मला आठवतात माझ्या टीनएजमध्ये मी ऐकलेल्या क्लासिकल गाण्याच्या मैफली...भीमसेनजींच्या  खूप ! जवळ जवळ दर शनिवारी. माझे वडील, दत्तोपंत देशपांडे.त्यांना आम्ही मामा म्हणायचो, ते मला घेऊन जायचे ! गाणं कुठलंही असो, ते ऐकून घरी आालो की त्यावर माझ्याशी ते चर्चा करायचे.. तासन् तास. मला त्या गाण्यातले बारकावे सांगायचे..  गाणं कसं ऐकावं याचंच मला शिक्षण मिळत गेलं ...मी समृद्ध होत गेले.. माझ्या जाणिवा प्रगल्भ होत गेल्या... कलेचं आयुष्यातलं स्थान काय असतं हे तेव्हाच उमजलं...गाण्याची गोडी लागली.. स्वतःही गात होतेच.. पण जास्त रियाज करायला हवा होता..
एकटे भीमसेनच नाही, तर  अमीरखां, मल्लिकार्जुन मन्सूर, बडे गुलाम अली खां, शोभा गुर्टू, बेगम अख्तर. अशा अनेक मोठ्या मोठ्या गायकांची गाणी ऐकली. आनंदाच्या तृप्तीचा अनुभव मी त्यातून घेतला... ईश्वराच्या जवळ जाणं म्हणजे काय व ते संगीतातून कसं जाता येतं हे अनुभवलं.
पुढे सवाईगंधर्व उत्सव सुरू झाला आणि मग काय? त्यात खूप दूरदूरचे व जवळचेही गायक ऐकायला मिळाले..
जीवनाची श्रीमंती काय व कशात  असते ते कळलं .
जीवनाच्या धबडग्यात पुढे हे जग माझ्यापुढून एकदम अंतर्धान पावलं....तंबोर्‍याच्या तारा जुळेनाशा झाल्या...
संगीत परकं झालं... मीच त्याला परकं केलं....हीच सर्वात मोठी चूक झाली माझ्याकडून. जो माझा श्वास होता, जो माझा परमानंदाचा ठेवा होता, त्यालाच मी दूर केलं...
थोडी  सवड मिळाल्यावर मी पुन्हा संगीताशी नाळ जोडण्याचा प्रयत्नही केला. श्री.ना.वा. दिवाण यांचेकडे गाणे शिकण्याला सुरुवात केली..परीक्षा देण्याचं ठरवलं...त्यानिमित्ताने रियाझ होईल असा विचार केला ...
त्याप्रमाणे तिसरी परीक्षा, गांधर्व महाविद्यालयाची, दिलीही. आणि पुण्यात पहिली आले... पण ते तेवढ्यावरच राहिलं...माझं गाणं सुटलं ते सुटलंच ....ऐकणंही सुटलं... मैफलींकडे मी पाठ फरवली...
सुरांचं जाग सोडून अ-सुरांकडे वळले...
 पण आजही मी टीव्ही वर यू-ट्यूबवर गाण्याचा जो आनंद घेऊ शकते, तो माझ्या वडिलांमुळेच. ते या जगात नाहीत, याला सुमारे तीस वर्षे झाली...पण त्यांनी जो मला  संगीताचा  'कान' दिला ते त्यांचे माझ्यावर उपकार आहेत.ते त्यांचं ऋण आहे...
त्यांनी संगीतविषयक खूप लेख लिहिले, पण त्यावेळी आम्ही तेवढं ऍप्रिसिएशन केलं नाही... आज जे उपलब्ध लेख आहेत तेच मी गोळा करू शकले व त्याचं एक पुस्तक(ई-बुक)  ई-साहित्य  या साईटवर तयार होत आहे... संगीतप्रेमी ते वाचतील याची मला खात्री आहे....पुस्तकाचं नाव आहे ''मी दत्तोपंत देशपांडे बोलतोय्''
22 एप्रिल2019 ला उपलब्ध होईल. तो त्यांचा 110 वा जन्मदिवस असेल !
वडिलांच्या ऋणातून थोडंतरी मुक्त होण्यासाठी मी ते सर्व लेख स्वतः टाईप केले.
........सध्या एवढंच !!
बुधवार, 13.03.2019.

Friday, November 23, 2018

आता कुठे जायचे आहे? आणि केव्हा?
उद्द‍ेशच कळला नव्हता आणि नाही.
काय जमवायचे आहे? काय राहिले आहे?
खूप सोडून दिले आहे; खूप सोडायचे अजून बाकी आहे...
हात सुटले पण पाय का बांधलेले आहेत?
वाट समोर दिसते आहे
पण पायांचं काय?
तो दोर कापायला हवा...
पुढे जायचंय..... तरंगायचं आहे...
मन संपवता येतं?
का ते कधी साथ सोडतच नाही?
त्याला आता काय हवं?
ते बोलतच नाही...
तरीही कहीतरी सांगतं....
मुखविण पाणी प्यालेली ती हरिणी
मुखविण बोलते सुद्धा?
आत्ता कळतंय,
ती हरिणी नव्हती ! ते चंचल मन ....
चिंचेच्या पानावर देऊळ रचता येत नाही...
पायाच नाही तर कळस कसला?....
म्हणून पाय सुटायला हवेत....
दोर कापायला हवेत !
वाट तर आहेच !!............23 11.2018
खू प दिवसांनी ब्लॉग लिहितेय …
आ त्ता च भीमसेन जोशी यांचे भजन यू tube वर ऐकले
भाग्यदा लक्ष्मि बारम्मा …. त्यांची फार आठवण आली
मी त्यांचे गाणे मनात जपून ठेवले आहे । पियाके मिलनकी आस ही जोगिया रागातील ठुमरी
हृदयाच्या जवळ आहे …. आजही ।
नुकतेच त्यांच्या मुलाचे -आनन्द याचे गाणे ऐकले … आवडले त्यांच्या दुसऱ्या मुलाचे पुस्तक ही वाचले
गाणारया चे पोर . राघव ने लिहिले आहे .
जरूर वाचावे असेच आहे . 

      एका सिनेमाची गोष्ट    ----संगीता जोशी
                        तुम्ही सर्वांनीच शोले हा हिंदी सिनेमा पाहिला असेल. ह्या सुपर हिट सिनेमाआधी आणखी दोन सुपरहिटस् क्लासिक हिंदीत येऊन गेले होते. एक 'मदर इंडिया' व दुसरा''मुगले-आझम.''हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक के.असीफ याचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. तो सिनेमा त्याला सर्वोत्कृष्ट व पूर्ण वास्तववादी बनवायचा होता.
      के, असीफ चं मूळ नाव करीमुद्दीन. त्यावेळचा एक हिंदी सिनेमा-नट करीमचा मामा होता.करीम लेडीज-टेलर होता.पण व्यवसायात त्याला गोडी वाटत नव्हती.मामा सोबत राहून त्याची सिराज अली यांच्याशी ओळख झाली. त्यांनी भांडवल देण्याची तयारी दर्शविली. आणि मुगले-आझमला हिरवा कंदील मिळाला. कथा इम्तियाज अलीची होती.अनारकली नावाची एक नर्तिका अकबर बादशहाच्या दरबारात होती व ती अत्यंत सुंदर होती, हाच काय तो कथेचा वास्तव धागा. त्याभोवती काल्पनिक कथा गुंफण्यात आली होती.
      सलीमच्या भूमिकेसाठी दिलिपकुमारला घेण्याचं ठरलं. अनारकली शोधण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली. पाच हजाराच्यावर पत्रे व फोटो आले. त्यातून अनेक चाळण्या लावून एकीची निवड केली गेली. तिचं नाव होतं मिस शैला दलेया.पण तिला उर्दू उच्चार जमेनात. मग अनारकलीसाठी अनेक नावांचा विचार सुरू झाला.कोणीतरी नर्गिसचं नाव सुचवलं. पण ते रद्द झालं. दिलिपकुमारशी मतभेद झाल्यामुळे तिनं नकार दिला होता. नूतनचंही नाव पुढे आलं. पण तीच म्हणाली,की ह्या भूमिकेसाठी फक्त मधुबालाच योग्य आहे ! आश्चर्य वाटलं ना? एक नटी स्वतःऐवजी दुसरीला घ्या म्हणते !!
तो काळच वेगळा होता. माणसं प्रामाणिक होती. दुसर्‍याचे गुण मान्य करण्याचा मोठेपणा दाखविण्याइतकं मन मोठं असायचं. आणि शेवटी मधुबाला अनारकली निश्चित झाली.
      मुगले-आझम चे संगीतकार होते नौशाद व गाणी लिहिली होती शकील बदायुनी यांनी.पटकथा लिहिली,कमाल अमरोही यांनी.यांनीच पुढे मीनाकुमारीशी लग्न केलं व पाकीजा हा सिनेमाही काढला.
      चित्रपट सुंदर व्हावा व प्रत्येक गोष्ट सौंदर्यपूर्ण असावी ह्या वेडाने असीफ इतका झपाटला होता की एका शॉटसाठी लागणारे गुलाबाचे फूल त्याने काश्मीरहून विमानाने मागविले होते. शॉटचे रीटेक झाले व फक्त फूल आणण्याचा खर्च पंधरा हजार झाला ! दरम्यान सिराजअली पकिस्तानमध्ये निघून गेला आणि पैशाची गंगा आटली.पण सुदैवाने शापूरजी पालमजी यांनी हात दिला आणि गाडी पुढे सरकली.
      मुगले-आझम मधील बहुचर्चित 'शीशमहल'' चा सेट उभारण्यासाठी अनेक कारागीर दोन वर्षे काम करत होते! त्याला लागणार्‍या काचा खास बेल्जियमहून मागविल्या होत्या. शीशमहल सजविण्यास लाखो रुपये खर्च झाले.अनारकलीला ज्या भिंतीत चिणायचे होते ती भिंत बांधण्यासाठी पन्नास हजार लागले. असा पैसा ओतला जात होता. जिथे त्यावेळी सात ते दहा लाखात उत्तम चित्रपट पूर्ण व्हायचा तिथे ह्या चित्रपटाला दोन कोटी लागले! आजच्या हिशेबाने तो खर्च पन्नास कोटीपर्यंत सहज जाईल.
      हे चित्रीकरण बारा वर्षे चाललं. पहिल्या काळात दिलीप-मधुबाला एकमेकांच्या खरोखर प्रेमात होते. पण घटना अशा घडल्या की त्यांना दूर व्हावं लागलं. म्हणजे अनारकलीला  सलीमपासून दूर केलं जातं याचा तिला वेगळा अभिनय करावा लागलाच नाही. ती त्याच दुःखातून प्रत्यक्षात जातच होती. शॉट संपला की दोघांची तोंडे विरुध्द दिशेला असत.
      वास्तववादी व्हावं म्हणून मधुबालेच्या पायात खर्‍याखुर्‍या जडजड लोखंडी बेड्या असीफनं घालायला लावल्या. त्यामुळे तिच्या पायाला जखमा झाल्या होत्या.
हा चित्रपट बारा वर्षांनी पूर्ण झाला. त्यावेळी नव्यानेच सुरू झालेल्या मराठामंदिर या थिएटर मध्ये पहिला शो झाला. ह्या प्रीमीयर ला अफाट गर्दी झाली होती. अनुपस्थित होते ते दिलीपकुमार आणि मधुबाला ! ह्याचं उत्पन्नाचं रेकॉर्ड पुढे शोले सिनेमापर्यंत अबाधित होतं. असा महत्वाकांक्षी होता के.असीफ.  
                                    संगीता जोशी.




Monday, January 2, 2017

नमस्कार !
सर्व वाचकांना नवीन 2017 या वर्षाच्या अनंत शुभेच्छा!
या वर्षासाठी तुम्ही केलेले संकल्प पूर्ण होवोत ही सदिच्छा.
 या नवीन वर्षी माझी दोन पुस्तके www.esahity.com या साईटवर प्रसिद्ध झाली आहेत.
शीर्षक आहे उर्दू शायरीचा आस्वाद  भाग 1  व भाग 2 ही दोन स्वतंत्र पुस्तके आहेत. मला खात्री आहे
काव्य व उर्दू शायरी आवडणार्‍या   सर्वांना ती नक्कीच आवडतील. विविध जुन्या व नव्या शायरांच्या
काव्यासंबंधीचे हे ललित लेख आहेत.!
कृपया वाचा व मला प्रतिक्रिया कळवा
धन्यवाद.
संगीता जोशी