एका सिनेमाची गोष्ट ----संगीता
जोशी
तुम्ही सर्वांनीच शोले हा हिंदी सिनेमा
पाहिला असेल. ह्या सुपर हिट सिनेमाआधी आणखी दोन सुपरहिटस् क्लासिक हिंदीत येऊन
गेले होते. एक 'मदर इंडिया' व दुसरा''मुगले-आझम.''हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक
के.असीफ याचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. तो सिनेमा त्याला सर्वोत्कृष्ट व पूर्ण
वास्तववादी बनवायचा होता.
के, असीफ चं मूळ नाव करीमुद्दीन. त्यावेळचा एक हिंदी सिनेमा-नट करीमचा
मामा होता.करीम लेडीज-टेलर होता.पण व्यवसायात त्याला गोडी वाटत नव्हती.मामा सोबत
राहून त्याची सिराज अली यांच्याशी ओळख झाली. त्यांनी भांडवल देण्याची तयारी
दर्शविली. आणि मुगले-आझमला हिरवा कंदील मिळाला. कथा इम्तियाज अलीची होती.अनारकली
नावाची एक नर्तिका अकबर बादशहाच्या दरबारात होती व ती अत्यंत सुंदर होती, हाच काय
तो कथेचा वास्तव धागा. त्याभोवती काल्पनिक कथा गुंफण्यात आली होती.
सलीमच्या भूमिकेसाठी दिलिपकुमारला घेण्याचं ठरलं. अनारकली
शोधण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली. पाच हजाराच्यावर पत्रे व फोटो
आले. त्यातून अनेक चाळण्या लावून एकीची निवड केली गेली. तिचं नाव होतं मिस शैला
दलेया.पण तिला उर्दू उच्चार जमेनात. मग अनारकलीसाठी अनेक नावांचा विचार सुरू
झाला.कोणीतरी नर्गिसचं नाव सुचवलं. पण ते रद्द झालं. दिलिपकुमारशी मतभेद
झाल्यामुळे तिनं नकार दिला होता. नूतनचंही नाव पुढे आलं. पण तीच म्हणाली,की ह्या
भूमिकेसाठी फक्त मधुबालाच योग्य आहे ! आश्चर्य वाटलं ना? एक नटी स्वतःऐवजी दुसरीला
घ्या म्हणते !!
तो काळच वेगळा होता. माणसं
प्रामाणिक होती. दुसर्याचे गुण मान्य करण्याचा मोठेपणा दाखविण्याइतकं मन मोठं
असायचं. आणि शेवटी मधुबाला अनारकली निश्चित झाली.
मुगले-आझम चे संगीतकार होते नौशाद व गाणी लिहिली होती शकील
बदायुनी यांनी.पटकथा लिहिली,कमाल अमरोही यांनी.यांनीच पुढे मीनाकुमारीशी लग्न केलं
व पाकीजा हा सिनेमाही काढला.
चित्रपट सुंदर व्हावा व प्रत्येक गोष्ट सौंदर्यपूर्ण असावी ह्या
वेडाने असीफ इतका झपाटला होता की एका शॉटसाठी लागणारे गुलाबाचे फूल त्याने
काश्मीरहून विमानाने मागविले होते. शॉटचे रीटेक झाले व फक्त फूल आणण्याचा खर्च
पंधरा हजार झाला ! दरम्यान सिराजअली पकिस्तानमध्ये निघून गेला आणि पैशाची गंगा
आटली.पण सुदैवाने शापूरजी पालमजी यांनी हात दिला आणि गाडी पुढे सरकली.
मुगले-आझम मधील बहुचर्चित 'शीशमहल'' चा सेट उभारण्यासाठी अनेक
कारागीर दोन वर्षे काम करत होते! त्याला लागणार्या काचा खास बेल्जियमहून
मागविल्या होत्या. शीशमहल सजविण्यास लाखो रुपये खर्च झाले.अनारकलीला ज्या भिंतीत
चिणायचे होते ती भिंत बांधण्यासाठी पन्नास हजार लागले. असा पैसा ओतला जात होता.
जिथे त्यावेळी सात ते दहा लाखात उत्तम चित्रपट पूर्ण व्हायचा तिथे ह्या चित्रपटाला
दोन कोटी लागले! आजच्या हिशेबाने तो खर्च पन्नास कोटीपर्यंत सहज जाईल.
हे चित्रीकरण बारा वर्षे चाललं. पहिल्या काळात दिलीप-मधुबाला
एकमेकांच्या खरोखर प्रेमात होते. पण घटना अशा घडल्या की त्यांना दूर व्हावं लागलं.
म्हणजे अनारकलीला सलीमपासून दूर केलं जातं
याचा तिला वेगळा अभिनय करावा लागलाच नाही. ती त्याच दुःखातून प्रत्यक्षात जातच
होती. शॉट संपला की दोघांची तोंडे विरुध्द दिशेला असत.
वास्तववादी व्हावं म्हणून मधुबालेच्या पायात खर्याखुर्या जडजड
लोखंडी बेड्या असीफनं घालायला लावल्या. त्यामुळे तिच्या पायाला जखमा झाल्या
होत्या.
हा चित्रपट बारा वर्षांनी पूर्ण
झाला. त्यावेळी नव्यानेच सुरू झालेल्या मराठामंदिर या थिएटर मध्ये पहिला शो झाला.
ह्या प्रीमीयर ला अफाट गर्दी झाली होती. अनुपस्थित होते ते दिलीपकुमार आणि मधुबाला
! ह्याचं उत्पन्नाचं रेकॉर्ड पुढे शोले सिनेमापर्यंत अबाधित होतं. असा
महत्वाकांक्षी होता के.असीफ.
संगीता जोशी.
No comments:
Post a Comment