Saturday, December 3, 2016

एक सुंदर अनुभव !
माझी नात देविका जोशी हिला एडिंबरा युनिव्हर्सिटीची M.Sc.डिग्री मिळाली. बायो केमिस्ट्री विषय होता. गेले वर्षभर तिने अतिशय कष्ट घेतले.मुळात भारतातील हवामान व स्कॉटलंड चं अतिथंड हवामान हा बदल सहन करून, परक्या देशात जाऊन अभ्यासात लक्ष केंद्रित करणं सोपं नव्हतं.आपल्या माणसांपासून दूर राहणं, खाण्याच्या सवयीत बदल करून आरोग्य सांभाळणं, सर्व विषयांचा स्वतःच अभ्यास लायब्ररीत बसून करणं,
लॅब मधे Experiments करणं, केवढा प्रचंड ताण ! तो सहन करून तिनं डिग्री मिळवली हे खरंच कौतुक आहे !
परवा 29 नोव्हेंबर 2016 ला कॉन्व्होकेशन सेरेमनी आम्ही इथं पुण्यात कॉम्प्युटरवर पाहू शकलो !! टेक्नॉलॉजी किती सोय करू शकते ! मनाला खूप आनंद झाला.
तिनं मिळवलेलं यश इतर जगाच्या मानाने फार मोठं नसेल कदाचित, पण ते तिनं ज्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मिळवलं आहे ते मी जाणते.म्हणूनच माझ्यानजरेतून ते खूप मोठं आहे, मोलाचं आहे.
परमेश्वर तिच्या असाच पाठीशी  राहो. 

Thursday, June 9, 2016

अलीकडेच रिलीज झालेला 'सैराट' हा मराठी सिनेमा काल पाहिला आणि मी भारावून गेले. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं मनापासून अभिनंदन ! दोन प्रेमी जिवांची ही वास्तववादी कथा आहे.लोक म्हणतात, यात जातीयवाद आहे. पण मला वाटतं, तसं कुठेही भाष्य नाही.समाजातील दोन स्तरातील जिवांची ती कहाणी आहे. जातियवादी बटबटीतपणा कुठेही नाही. चित्रपटाचा स्क्रीन-प्ले इतका बांधीव आहे की कुठेही लूज-एंड नाही. प्रेक्षकाला खिळवून टेवण्याची ताकद त्यात आहे. कथा प्रभावीपणे पुढे नेली आहे.अनावश्यक तपशील हुशारीने टाळले आहेत. उदा. नायक-नायिकांचे हैद्राबादला येणे, नोकरी मिळणे, तेलुगु शिकणे, तिचे बाळंतपण, व शेवटी होणारी झटापट...सर्व टाळल्यामुळे कथेला 'पेस' आहे. शिवाय   त्यातून प्रेक्षकांच्या बुद्धीवर विश्वास दाखवला हे प्रतीत होतं ते वेगळंच !
शेवटी छोटा आकाश रडत जातो, पण ते रडणं आवाजरहित (Mute) ठेवल्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर शेवटच्या दृश्याचा प्रचंड impact होतो व राहतो. त्यामुळेच प्रेक्षक स्तब्धपणे चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो.
नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन उत्कृष्ट !
पहिलाच चित्रपट असूनही नायिकेचा अभिनय उत्तम आहे. सुरवातीची डॅशिंग अर्चना व नंतर प्रेमासाठी परिस्थितीशी जुळवून घेणारी पत्नी तिनं छान उभी केली आहे. श्रेय डायरेक्टरचेही आहे. पण ती राष्ट्रपती-पुरस्कारास पात्र होती हे निर्विवाद ! परशा ही उत्तम !
पात्रांची निवडही चांगली आहे.हा चित्रपट यशाची चढती कमान उभारत आहे, हे साहाजिकच आहे.

Sunday, May 15, 2016

नवीन ब्लॉग!
नमस्कार !
जर तुम्हाला उर्दू, मराठी  कविता, गझला आवडत असतील तर माझा हा ब्लॉग नक्की पाहा.
PoetrySangeetaJoshi.blogspot.com
 तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित.
यात माझ्या स्वतःच्या रचना प्रामुख्याने असतील.
पण इतर कवींच्या मला आवडलेल्या  रचनाही अधून मधून तुम्ही वाचू शकाल.
मग? भेटू या; दुसर्‍याही ब्लॉगवर !!
संगीता.

Wednesday, May 4, 2016

ब्लॉग---                                              सुर...

तुम्ही ‘सुर’ हा हिंदी सिनेमा पाहिला आहे?2002 साली आला होता. यात लकी अली हा महमूद चा मुलागा नायक होता. गौरी कर्णिक नावाच्या अभिनेत्रीचा हा पदार्पणाचा चित्रपट होता. निदा फाजली यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली होती. निदांचा दुःखद मृत्यु झाला, त्यानंतर एका मासिकासाठी मला त्यांच्याबद्दल लेख लिहायचा होता. त्यावेळी मी ‘सुर’ मुद्दाम पाहिला. यू-ट्यूब वर. त्यातील एका गाण्याला ‘बेस्ट लिरिक्स’ हे ऍवॉर्ड  निदांना मिळालं होतं म्हणून आवर्जून पाहिला.
खरं सांगू? त्यातील गाण्यांनी मला अक्षरशः वेडं केलं ! लकीचं संगीत, चाली आणि निदांचे शब्द यांचा सुरेख संगम तर झाला आहेच; पण सिनेमाची कथा त्याचबरोबर सर्व कलाकारांचे अभिनय उत्तम आहेत. दिग्दर्शिका तनुजा चंद्रा यांचं दिग्दर्शनही उत्कृष्ट आहे. महमूद हा पूर्वीचा विनोदी अभिनेता. पण लकीनं तो मार्ग न पत्करता सीरीयस भूमिका फारच छान केली आहे.त्याला टीना (नायिका) बद्दल वाटणारी जीलसी, त्यानंतर तिच्या प्रेमात पडल्यानंतरचा रोमँटिक हीरो, पुढे तिच्या स्टेज कॉन्सर्टच्यावेळी तिच्या गाण्यानं आनंदानं भावविभोर झाल्याचा अभिनय हे सारं त्यानं अत्यंत ताकदीने दाखवलंय. आधीची जीलसी संपून त्याच्यातील जागा झालेला शिक्षक त्याने प्रभावीपणे साकारला आहे.
सुर ची कथा संगीताभोवतीच फिरते. कथाही बांधेसूद आहे. दिव्या, हर्मन, अकील,टीनाची बहीण या भूमिका करणार्‍या नटांची नावं मला माहीत नाहीत; पण त्यांनी उत्तम कामं केली आहेत. गौरी कर्णिकच्या अभिनयाची तर स्तुती करावी तितकी थोडी आहे. ‘कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना’ या गाण्याच्या शेवटी तर तिनं कमाल केली आहे ! मला वाटतं हे व आभि जा ही दोन्ही गाणी महालक्ष्मी अय्यर यांनी गायली आहेत. त्यांचा आवाज, त्याचा पिच, शब्दोच्चार सगळं सुयोग्य आहे. ते ऐकून मला वाटलं की ‘There is always  room at the top !’ हे वाक्य अक्षरशः खरं आहे.महालक्ष्मींनी ते सिद्ध केलंय्.गौरी, लकी, तनुजा या सर्वांना भेटावं व त्यांचं भरभरून कौतुक करावं असं मला वाटतं. ते कसं शक्य होईल? म्हणून ब्लॉग लिहून तुम्हाला तरी सांगावं, हा विचार केला. तुम्ही जरूर हा चित्रपट पाहा व संगीत, व्हायोलिन आणि छान प्रेमकथा एन्जॉय करा. मला खात्री आहे तुम्ही त्यात हरवून जाल व रोज यातील गाणी ऐकत रहाल; मी ऐकतेय् तशी !
‘अनुराधा’ (बलराज सहानी व लीला नायडू) या संगीतप्रधान सिनेमानंतर मला तितकाच आवडलेला हा चित्रपट आहे ! ‘सुर’ !!
4 मे 2016.                                            ---संगीता जोशी


Thursday, March 31, 2016

Mini Stories

प्रेमाची सफलता.....

      निधि ने आपले वडील संजय यांना सांगितले की ती यश वर प्रेम करते आणि ती त्याच्याशी लग्न करणार आहे. तेव्हापासून ते अस्वस्थ होते, हे निधीच्या लक्षात आले होते.आईची काही हरकत नव्हती. जातीपातीच्या बाबतीत त्यांच्या घरातील शिकवण अत्यंत आधुनिक होती. मग पप्पांचा विरोध का हेच निधीला समजत नव्हतं. यश सोनोने उमद्या व्यक्तिमत्त्वाचा सुयोग्य जोडीदार होता. तो तिचा टेनिस कोच. संजयनाही तो आवडायचा. मग पप्पा काही बोलत का नाहीएत? होकार का देत नाहीएत? आपल्या लाडक्या निधीचे सगळे हट्ट पुरविणारे संजय आत्ताच का अबोल झालेत?
      निधी ने बरेच दिवस वाट पाहून विषय काढलाच ! ‘पप्पा, मी नि यश एकमेकांशिवाय राहू शकणार नाही.’
      ‘बेटा, कसं सांगू ? पण आता सांगावंच लागेल. मोठी रिस्क घेऊनही सत्य सांगावंच लागेल. तू, तुझी आई तिरस्कार तर नाही करणार ना माझा? पण तरीही ऐक.
संजय माझाच मुलगा आहे !! तो तुझा भाऊ आहे. कशी परवानगी देऊ मी तुमच्या लग्नाला? ....आता पुढे ऐक. यशलाही जे माहीत नाही, ते आता तुला सांगतोय्.
 ‘निर्मला माझ्या ऑफिसात कामाला होती.हुषार. सक्षम. ब्लॅक ब्यूटी म्हणायचे सर्व तिला. मी नुकताच कामाला लागलो होतो. आम्ही आकर्षित झालो होतो; आणि एक दिवस चूक घडली. वेगळा विचार मनातही आला नाही. तो काळ वेगळा होता. मी तिच्याशी लग्न नाही करू शकलो. यशचा जन्म पंढरपूरला झाला.संस्थेत खरी माहिती सांगूनच संजयचा सर्व खर्च मी उचलला. मोठा झाल्यावर वीस वर्षांनी निर्मलाने त्याला दत्तक घेतला. ती अविवाहितच राहिली होती. पुन्हा आमचा कधीच संबंध आला नाही. मात्र मी तिला अप्रत्यक्षपणे पैसे पोहोचवीत राहिलो. ही बाब सोडली तर तुझ्या मम्माशी मी कधी प्रतारणा केली नाही. आता तूच काय तो निर्णय घे.तिला आणि यशला काय सांगायचं, काय नाही हे आता तुच ठरव.’   
      निधी अवाक् होऊन संजयकडे फक्त बघत राहिली.
( ही कथा फिल्म रायटर्स असोसिएशन कडे रजिस्टर्ड आहे.)
31 मार्च 2016                                    ------ संगीता जोशी             


***** 

Monday, February 8, 2016

Musicajoshi.blogspot.in

                        Blog 43 . // 5.2.2016
 उत्सव आनंदाचा....
1941   ची पहिली तिमाही संपत आली होती. ताराबाईचे गर्भारपणाचे दिवसही भरत आले होते. त्याकाळी बाळंतपणं सामान्यतः घरीच होत असत. पण ताराबाईचं नाव दवाखान्यात घातलं होतं. ताराबाई दत्तूची बायको. वडील गेल्यामुळे दत्तू व त्याची आई दोघेही दत्तूच्या बहिणीकडे म्हणजे ताईकडे रहात असत. धुळे शहरात. त्यावेळी ते छोटंसं ‘शहर’ होतं. म्हणजे शाळा होती; ट्रेनिंग कॉलेज होतं; दवाखाने होते; प्रवासासाठी खाजगी बस होत्या. मात्र नावाप्रमाणेच धुळीचे रस्ते होते. गल्ल्या होत्या.त्या चांगल्या मोठ्या होत्या. आगरा रोड, त्याला समांतर अशी खोलगल्ली,पुढे पाचवी गल्लीत. त्यात महादेवाचं मंदिर होतं; आणि नंतरची सहावी गल्ली.ताईचं घर याच सहाव्या गल्लीत होतं. तारगे भुवन समोर.जुनं घर शंकरशेट मुंदडांच्या मालकीचं होतं. सहाव्या गल्लीपासून सातव्या गल्लीपर्यंत. अंगण ,ओटा, ओसरी, लांबच्या लांब माजघर, मग मोठं देवघरासह स्वयंपाकघर. मागे एका बाजूला बंद मोरी व समोर मोठी उघडी मोरी.5 फूट बाय 5 फूटची.शेजारी आड म्हणजे विहीर. मागे परस. खूप मोठा. तिथे टॉयलेट व भांडी घासण्याची मोरी. शेवटी मागचं दार. हे भलं मोठं जाड लाकूड. ते लावून लाकडी सरा एका भिंतीतून ओढून समोरच्या दुसर्‍या  भिंतीत घालायचा की दार सुरक्षितपणे बंद व्हायचं.
      दिवस गेले होते तरी आणि दिवस भरेपर्यंतही अंगणापासून मागच्या दारापर्यंत आख्खं घर ताराबाईलाच झाडावं लागे. एकदा नव्हे; दोनदा. आठ दिवसांनी मातीच्या जमिनी शेणानं सारवाव्या लागत. चांगला व्यायाम व्हावा म्हणून. कामं करत राहिलं की बाळंतपणाला त्रास होत नाही ही विज्ञानाधारित गोष्ट तेव्हाही ‘अडाणी’ बायकांनासुद्धा माहीत होती. संध्याकाळी चारच्या पुढे ताई व तिची बहीण ( ही लग्न होऊन सासरी गेली अन् लगेच परत आली;तेव्हापासून ताईकडेच होती; तिला सगळे मावशी म्हणत.) मावशी महादेवाच्या देवळात पोथीला गेल्या की ताराबाई संध्याकाळचे केर-वारे करी. कंदिलाच्या,चिमणीच्या काचा पुसून ठेवी. हवं असेल तर रॉकेल भरून ठेवी. ही संध्याकाळची तयारी करून ठेवावी लागे. कारण वीज नव्हतीच. सासू घरातच असे. वपन केलेली व लाल अलवाण नेसलेली. म्हातारी. ती काही करू शकत नसे. कारण डोळ्यांना दिसतच नव्हते. दत्तूची बायको गोरी व दिसायला चारचौघींपेक्षा उठून दिसणारी आहे,हे तिनं लोकांकडूनच ऐकलं होतं.
      देवळातून बायका घरी येईपर्यंत सासू ताराबाईला जवळ बोलावून विचारपूस करत असे. ‘तुला फार काम पडतं ना गं ?’ ‘ताई फार बोलते का ग तुला? माझी लेक असली तरी स्वभाव माहीत आहे मला तिचा.’ अशी फुंकरही घालायची. अन् सांगायची ‘आडावर पाणी ओढायला जाऊ नकोस बरं आता.नववा लागलाय् ना, आता झेपेल तेवढंच काम कर.
ताईला काय सांगायचं ते मी बघते. पण ताराबाई, मुलीकडे आश्रित रहातोय ना आपण.
म्हणून सहन करावं लागतं. बोलायला जीभ रेटत नाही.मोहिदेकर मात्र चांगला माणूस.
दत्तूला आत्तापेक्षा चांगली नोकरी लागली की राहू वेगळे आपण.तोपर्यंत आहे, तोंड दाबून बुक्कयाचा मार’!  सासवा-सुनांच्यात असं हितगूज चालायचं.
      त्या दिवशी संध्याकाळचा केर काढून झाला. ताराबाईच्या पोटात थोडं दुखू लागलं होतं. ती काही पहिलटकरीण नव्हती. पहिलं बाळंतपण माहेरी, पुण्याला दवाखान्यातच झालं होतं. पण मुलगा पोटातच गेला होता. यावेळी ती सावध होती. ताई-मावशी घरी आल्या.तिचा चेहरा पाहूनच ताईनं विचारलं, ‘ताराबाई, काय गं? काही होतंय का ?’
पोट दुखतंय म्टल्यावर म्हणाल्या, ‘थांब अजून. कळा वाढल्यावर दवाखान्यात जायचं’
   दवाखाना गल्लीच्या कोपर्‍यावरच होता. डॉ.महाजनींचा. त्यावेळी एखादा डॉक्टर सर्वप्रकारची प्रॅक्टिस करत असे. स्पेशॅलिस्टचा जमाना नव्हता.
      कळा वाढत नव्हत्या. ताईने पाण्याचा हंडा चुलीवर तापायला ठेवला. मोठ्या परातीत ताराबाईला बसवलं आणि कमरेवर कढत-कढत पाणी घातलं. सोसवत नव्हतं पण ताराबाई बोलू शकली नाही. उठून नऊवारी साडी नेसणंही ताराबाईला जड जाऊ लागलं, इतक्या कळा वाढल्या होत्या. ताईमावशी ताराबाईला घेऊन दवाखान्याकडे निघाल्या.पायीच. दत्तू नोकरीनिमित्त रावळगावला होता. शंभर पावलांवरच होता दवाखाना.वाहनं नव्हतीच. टांगे असत पण ते फक्त स्टेशनवर जाण्यापुरतेच.
      ताराबाई दवाखान्याच्या पायरीवर बसली. लेबर रुम पहिल्या मजल्यावर होती. डॉक्टरांची बायको,यमूताई ताराबाईची मैत्रीणच होती. तिनं हाताला धरून तिला वर नेलं. निरोप मिळाल्यामुळे डॉक्टर लगबगीने आले. पण ते वरच्या मजल्यावर जाईपर्यंत यमूताई व नर्सच्या मदतीनं ताराबाई सुखरूप बाळंत झाली होती. आठ पौंडाचं बाळ जन्माला आलं होतं. अमावास्येच्या रात्री साडेबाराचा मुहूर्त गाठला होता बाळानं !
      दुसर्‍या दिवशी पहाटेच ताईच्या ओट्यावर वाजंत्री वाजू लागली.सगळी गल्ली कान देऊ लागली. गुलाबशेट मारवाडी कोपर्‍यावरच्या आपल्या दुकानातून येऊन ताईकडे डोकावला. ‘काय ताई, मामींना (ताराबाईंना) मुलगा झाला ना? तरीच वाजंत्री वाजतीय. सुखरूप सुटका झाली ना?’
      ‘गुलाबशेट, सुखरूप झाली;मुलगी झाली दत्तूला. मुलगा नाही’...ताई.
      ‘अरेच्या? मुलगी झाली अन् तरी वाजंत्री लावली?’ गुलाबशेट बोलले.
      ‘ मग? आम्हाला मुलगी सुद्धा मुलासारखीच आहे.’
      ‘भाग्यवान आहे म्हणायची मुलगी’! गुलाबशेट गेले.
इतक्या जुन्या काळी मुलगी झाल्याचा आनंद त्या पिढीनंही व्यक्त केला हे विशेषच म्हणायला हवे.आज मुलीचा गर्भ वाचविण्यासाठी प्रबोधनाचा आटापिटा करावा लागतो त्या पार्श्वूभूमीवर त्या ‘अडाणी’ लोकांचा विचारांचा सुशिक्षितपणाच सुसंस्कृतपणा उठून दिसतो.
                        ********

  

  

Wednesday, February 3, 2016

3rd  Feb 2016

काल एक video , WhatsAppवर आला. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या गाण्याचा. 6-7 मिनिटांचाच. पण तरुणपणचं त्यांचं ते गाणं. इतका जोश, इतका फोर्स, इतक्या जोरकस ताना ! लढाई केल्यासारखी फिरत आणि दाणकन् घाव घातल्यासारखी सम पकडणं ! पण नजाकत तेवढीच ! वा ! तिन्ही सप्तकातल्या ताना नुसत्या बरसत होत्या. चीज होती 'मोहमदशा रंगीले रेऽ बलमा; तुमबिन मै का कारी बदरिया, निक ना सुहावे..'
राग बहुधा सुहा कानडा. पण वेगळा कानडाही असू शकेल....स्तिमित झाले. मैफल खाजगीच होती. मोजकेच श्रोते...त्यात माझे वडील दत्तोपंत देशपांडे श्रोत्यांमधे समोरच होते..त्यांच्या शेजारीच  डॉ. नानासाहेब देशपांडे.
सवाई गंधर्वांचे जावई. तबल्याच्या साथीला चंद्रकांत कामत. हार्वमोनियमर एकनाथ ठाकूर. तानपुर्‍यावर मागे वत्सलाबाई ! (सौ. भीमसेन). दुसर्‍या तंबोर्‍यावर साळगावकर. सगळेच परिचित. पण ह्यापैकी कोणीही आज हयात नाहीत ! सगळ्यांबद्द‍ल दुःख होतंय्.... संगीताचं हे जग मी किती जवळून अनुभवलं आहे ! माझ्या तारुण्यावस्थेत मी ह्याच जगात हरवून गेलेली होते.
भीमसेन तेव्हा उभरते घायक होते. नुकतेच पुण्यात आलेले.मी तेव्हा त्यांची जवळ जवळ प्रत्येक मैफल ऐकली. त्यांची नुसती चाहतीच नाही, भक्त झाले.
कोण विश्वास ठेवेल की ते तेव्हा आमच्या लक्ष्मी रोडच्या घरी गणपती चौकात. सायकलवर यायचे. वडिलांना खालूनच हाक मारायचे, 'पंतऽऽ....'
हाक ऐकून मामा (मी वडिलांना मामा म्हणायची)  गॅलरीत  जायचे;म्हणायचे, भिमण्णा, वरती या; रजनी (माझे माहेरचे नाव) तुम्हाला चहा घेतल्याशिवाय सोडायची नाही.' मग भीमसेन देवळापाशी सायकल लावायचे; वर यायचे . मी मनापासून चहा बनवायची. चांगला होईल अशी काळजी घेऊन...
माझं वय तेव्हा असेल पंधरा -सोळा किंवा त्याहूनही कमी !मग दोघांच्या गप्पा मी ऐकत बसायची...
अशा रीतीने मी हिमालय घडतांना पाहिला आहे! तेव्हा थोडंच माहीत होतं आपण एका 'भारतरत्न'व्यक्तीसमोर उभे आहोत?
सीता कागल. पुण्याचे त्यावेळचे पोलिस कमिशनर कागल यांच्या ह्या पत्नी. त्या गायिका होत्या. त्यांच्या बंगल्यावर कँपमध्येजवळजवळ दर शनिवारी भीमसेन चं गाणं असायचं. मी व मामा न चुकता जात असू.त्यावेळी तबल्याची साथ लालजी गोखले करायचे.हे नट विक्रम गोखलेंचे काका. चंद्रकांत गोखलेंंचेधाकटे भाऊ.त्यांची आई म्हणजे पहिली अभिनेत्री कमलाबाई गोखले.  हार्मोनियमवर नेहमीच अप्पा जळगावकर.
घरी गाणं म्हणजे मोजकेच श्रोते ! भीमसेन असे काही जमून गायचे की बस्. सगळे दर्दी श्रोते.भिमसेनचा जणू तो रियाजच असायचा. नवीन नवीन राग.अनवट नाही पण वैविध्य. तेव्हाच मी पूरिया धनाश्री, अभोगी..दरबारी, सुहा कानडा..असे कितीतरी ! संध्याकाळ व रात्रीचे राग. मग नाट्यगीतं !ठुंबर्‍या.
'पानीभरेली कौन अलबेली कि नार, नैना रसीले ऽ...' आत्ता अगदी आत्ता माझ्या कानात घुमतोय् तो आवाज !
ते लाडिक स्वर आळवणं...नैना रसीले..झमाझम...अलबेऽऽऽ या ठिकाणी आवाजाची वलयं... कुठे विरली?
कुठे गेलं ते सगळं विश्व?  या विश्वात काहीच नष्ट होत नाही ना?   मग कुठे सापडतील ते स्वर ? तो आवाज?
कुठे?.... कुठे?... मलाच शोधायला हवं....

Wednesday, January 20, 2016




21 जानेवारी 2016.
आज एका आवडत्या विषयावर भाषण ऐकायला मिळालं. वक्ते होते डॉ.अक्षयकुमार काळे.
आणि विषय होता गालिब.प्रसिद्ध उर्दू शायर.200 हून अधिक वर्षे झाली पण अजुन त्याची शायरी वाचली जाते.त्यावर समीक्षा केली जाते. अाजच्या सारखी त्यावर भाषणेही दिली जातात.
मी सुद्धा गालिब वर लिहिले आहे...
दिले-नादॉं तुझे हुआ क्या है । आखिर इस दर्द की दवा क्या है ।।
हा शेर तर सगळ्यांनाच माहीत आहे. अर्थ असा की ---प्रेम केलं की वाट्याला येतं ते दुःखच.
ह्या प्रेमाच्या दुःखावर काहीच इलाज नाही का? मग अरे, माझ्या अविचारी (मूर्ख) हृदया, तुला झालंय तरी काय?
का तू प्रेमात पडला आहेस?
गालिब चे आणखीही शेर पुढच्या Blog मधे लिहीन.