24.8.13
प्रिय,
आज एकाकीपणाची कविता
कुठेतरी वाचली आणि तुझी तीव्र आठवण झाली. कवितेतलं राक्षसप्राय आभाळ माझ्या
अंगावर झेपावलं नि त्यानं मला चारही अंगांनी वेढून घेतलं. त्याच्या विक्राळ, गरगर
गिरक्यांमध्ये फिरतांना संवेदनाहीन होऊन मी डोळे मिटून घेतले होते,एक हात बाहेर
काढून. वाटलं होतं तू कुठून तरी अचानक येऊन धरशील माझा तो हात; आणि या गरगर भोवर्यातून
मी बाहेर पडेन. सहीसलामत. केव्हातरी सारं थांबलं. जिथल्या तिथं. आभाळ जागच्या जागी
गेलं आणि मी तिथे कवितेच्या ओळीत निपचित पडलेली सापडले,माझी मला.भोवंडून
गेल्यामुळे त्राण सरलेली. पण मन कुठेतरी शांत झालं होतं. निमालं होतं. तूच जणू
भेटून गेल्यासारखं. मग वाटलं ही एकाकीपणाची कविता खरी नाहीच. एकाकीपणा कधी खरा
नसतोच ! काहीच पूर्ण अर्थानं एकाकी नसतं. आभाळाजवळ शून्यत्व असतं. मातीजवळ ममत्व.माझ्याजवळ तुझा भास आहे; तुझ्याजवळ माझी हाक. आपण एकाकी असतांनाच एकाकी नसल्याची ही
प्रसन्न जाणीव आपलं तसं एकाकीपण संपवून टाकते. असं लोभस एकाकीपण कोणाला नको वाटेल?
असं हवंसं वाटणारं एकाकीपण. समागमानंतर एकमेकांकडे पाठ करून विसावलेल्या
जोडप्याच्या तृप्त, आत्ममग्न विसाव्यासारखं. अंगभर पसरलेलं. दुखरं तरीही सुखद.
एकाकीपणाच्या गाभ्यात असतात असंख्य बहर,असंख्य इंद्रधनुष्यं !.......
तू आणि मी कधीच एकाकी होणार
नाही आहोत; हो ना?
साजण.
त्याचं स्वप्नचित्र रेखाटतांना
उलगडताहेत...गंधाळताहेत रातराणी...
शृंगारलेल्या
मधुमीलनाच्या आत्मविस्मृत रात्री...
पहाटवार्याच्या धीट नि आडदांड
धसमुसळेपणानंच,तेव्हा
निखळून पडते एकेक पाकळी त्या रात्रीची..
सावरता येत नाहीत अशावेळी पूर्वेचे वाहणारे रंग...
प्रकाशाच्या आरोहात, का असे विरून जातात प्रीतीचे
सूर?
आणि सुरू होतात स्वप्नांचे अवरोह?
साजण ...निघून गेलेला...
धप्प ! कोसळलेलं वास्तव...!
मऽऽऽ गऽऽऽ रेऽऽऽ
साऽऽऽ......साजणाचा !
No comments:
Post a Comment