Tuesday, April 16, 2013


हाय! हॅलो!! नमस्कार !! साईराम !!!
ही आपली पहिलीच भेट. पहिलीच ओळख. निदान ह्या माध्यमातून.पण पहिलेपणाच्या सर्व गोष्टी तपशीलासह निश्चितच आपल्या लक्षात राहतात,नाही का? तुमचा काय अनुभव? हाच असणार.मला माहीतय्.उदाहरणार्थ पहिलं प्रेम     ! (म्हणजेच दुसरं,तिसरं...आयुष्यात येतच असतं!!)तर, हे पहिलं वहिलं प्रेम. त्याबद्दलच मी आपल्या ह्या पहिल्या भेटीत बोलणार आहे.माझ्या पहिल्या प्रेमाविषयी.....कान टवकारले ना?
      ......माझं पहिलं प्रेम म्हणजे गझल !! उर्दू असो, मराठी असो..मी तिच्या प्रेमातच आहे... आणि मग ज्या चांगल्या गझला प्रिय होतात त्यांचे कवीही हृदयाजवळ राहतात.माझी ज्या उर्दू कवीशी प्रथम ओळख झाली तो होता साहिर लुधियानवी.त्यानं हिंदी सिनेमातली खूप गीतंही लिहिली.त्याची एक गझल ...तुम्हाला माहीतही असेल ती.
      मैं ज्ञिन्दगीका साथ निभाता चला गया
      हर फिक्र को धुएमें उडाता  चला गया...1
देव आनंदची आठवण झाली ना? त्याच्या सदाहरित व्यक्तिमत्वाइतकेच हे टवटवीत व अर्थपूर्ण शब्द...सोपं लिहिणं खूप अवघड असतं म्हणतात. इतकं सोपं की ते सहज हृदयाला भिडतं.जे शब्द हृदयाला भिडतात त्‍याचे प्रतिध्वनी मनात उमटत राहतात.माझ्याही मनात ते उमटलेत...मराठीत..
      मी जीवनास मूक स्विकारीत राहिलो
      चिंतेस फुंकरीवरी झटकीत राहिलो...1
हे मराठी शेरही मी त्याच चालीत गुणगुणत राहिले.पुढचे तीन उर्दू शेर व त्यानंतरचे मराठी शेर वाचून बघा.
      बर्बादियोंका सोग मनाना फिज्ञूल था
      बर्बादियोंका जश्न मनाता चला गया...2
                  उद्ध्वस्त जाहलो न कधी खेद मानिला
                  उद्ध्वस्त हाच उत्सव मानीत राहिलो..2
      गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां
      मैं दिल को उस मकामपे लाता चला गया...3
                  सुखदुःख एकरूपच होते जिथे कुठे
                  मन मी तिथेच नेउन रमवीत राहिलो...3
      जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया
      जो खो गया मैं उसको भुलाता चला गया...4
                  दैवास मान्य तेच ओंजळीत राहिले
                  जे लाभले न, सर्वच विसरीत राहिलो...4
तिसर्‍या शेरात तर साहिरने भ.गीतेतलं तत्वज्ञानच सांगितले      आहे.
            सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
            ततो युध्दाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि  
---सुख-दुःख.लाभ-हानी,जय-पराजय याचा विचार न करताच जीवनाची लढाई लढली पाहिजे! कवी हा तत्वज्ञानीच असतो असे म्हणतात ते उगीच नाही,पटलं?सिनेमाच्या गीतांखेरीज साहिरची इतर शायरीही वेड लावणारी आहे. ज्या एका कवितेनं त्याच्या डोक्यावर मुकुट(ताज) ठेवला,ती कविता पुढल्या भागात.....
(क्षमस्व!!उर्दूचे लेखन उच्चारानुसार आहे व नुक्ते देणे अडचणीचे आहे, हे कृपया समजावून घ्यावे)                                   
                                संगीता जोशी.(मराठी कवयित्री-गझलकार)

Sunday, April 14, 2013


छोट्या, पण मोठ्या गोष्टी
                                संगीता जोशी
      जसं व्यक्तीला नशीब असतं, तसं एखाद्या गावालाही नशीब असतं का? असावं ! कारण अनेक मान्यवर व्यक्ती, अनेक उत्तुंग व्यक्तिमत्वं त्या गावाशी जोडलेली असावीत, हे त्या गावाच्या नशिबातला भाग्ययोगच नाही का? पुण्याचं पुण्य खरंच मोठं की आमच्या पुण्याला असे खूप थोर लोक लाभले आहेत की ज्यांच्यामुळे या शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे..
      अशांपैकीच एक आदरणीय व्यक्ती म्हणजे डॉक्टर एच्.व्ही. सरदेसाई. नुकतीच हनुमानजयंती होऊन गेली. त्यादिवशी त्यांचा वाढदिवस असतो.त्यांना शुभेच्छाही दिल्या.ह्या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कारही त्यांनाच देण्यात आला होता,त्याबद्दलही अभिनंदन केलं.अशा मोठ्या व्यक्तीचं मोठेपण नेमकं कशात असतं? असा विचार मनात येऊन गेला.तेव्हा त्यांच्याबद्दल वाचलेल्या काही गोष्टी आठवल्या.त्यातलीच ही एक..
      काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा वडिलांचे मित्र, प्रसिध्द उद्योगपती लालचंद हिराचंद हे डॉक्टरांच्या समाचाराला आले. बाकीची बोलणी झाल्यावर त्यांनी डॉक्टरांना विचारले,
            ''मग आता आई कोठे असतात? तुझ्याकडेच का?''
डॉक्टर उत्तरले, ''नाही.'' लालचंद शेटांनी पुढे विचारले, '' मग, तुझ्या भावाकडे का?''
यावर डॉक्टर म्हणाले, ''मीच आईकडे असतो !''
लालचंद शेटही हे अनपेक्षित उत्तर ऐकून कौतुकमिश्रित समाधानानं हसले.
      खरोखर, ह्यातून डॉक्टरांच्या मनावर घडलेले सुसंस्कार दिसतात,नाही का? त्यांचं मोठेपण कळतं. सर्वसाधारणपणे कोणीही असंच उत्तर दिलं असतं की, आई माझ्याकडे असते. पण आपल्यावर आईचं छत्र आहे,आणि घर हे प्रथम आईचं आहे, म्हणून मी तिच्याजवळ राहतो हा व्यक्त झालेला भाव निश्चितच दुर्मिळ आहे !
      मोठ्या व्यक्तींचं मोठेपण अशा बारिक-सारिक गोष्टीतूनही व्यक्त होत असतं.व्यवसायात तर ते यशस्वी आहेतच.त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांना औषध देऊनच नव्हे तर मानसिक आधार देऊन ते बरं करतात.
      ते लहान असतांना एका फकीराने त्यांच्या आईला सांगितले होते की, ''हा मुलगा भाग्यवान आहे. याला साक्षात्कार (देवदर्शन) होईल''
      हे समजल्यावर एकाने त्यांना सहज विचारले, ''झालंय् तुम्हाला देवदर्शन?''
ते म्हणाले, ''हो. जेव्हा माझ्या उपचारांनी रुग्ण बरा होतो, तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर जो आनंद दिसतो, त्यातच मला देव दिसतो !''
      आहेत ना ही थोर माणसांची लक्षणं? याबद्दल वाचूनही आपल्याला आपल्यात सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते.
      पुणे शहराचं समाजजीवन समृध्द करण्यात डॉक्टरांचाही वाटा आहे. आम्हा पुणेकरांना त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे ! त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.
                                          संगीता जोशी.
                       
------------------------------------------------------------------------------------------------------------Blog 6. 17.4.2012.

Tuesday, April 2, 2013


    निरागस प्रेम......
ती एक जाहिरात तुम्ही टी.व्ही.वर पाहिली आहे ना? एक मुलगा सोफ्यावर पहुडला आहे.. सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून पग जातीचा कुत्रा त्या मुलाला टी-शर्ट ओढून उठवतो...सायकलवरून त्याची आवडती मुलगी तिथून जाते.. 
दुसर्‍या जाहिरातीत तीच दोघं जिन्याच्या लँडिंग मधे बोलत बसलेली असतात...एक सेल्समन एक बॉक्स घेऊन येतो... पण हे पग त्याच्यावर भुंकून त्याला थोपवतं.....व्होडाफोनच्या जाहिरातीतील त्या दोघांचं प्रेम किती कोवळं व निरागस दाखवलंय नाही? ती जाहिरात पाहिल्यापासून एक गोष्ट सारखी आठवतेय मला. तीच तुम्हालाही संगायचीय. वाचा तर....
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.दिल्लीच्या चांदणी चौकाजवळ त्यावेळी एक झोपडपट्टी होती.त्यात एक मुस्लिम कुटुंब रहायचं. चार मुली आणि आई-वडील.वडिलांची थातुर-मातुर नोकरी.त्यातही धरसोड. त्यामुळे सर्वांना गरिबीचे चटके सहन करावे लागत होते. मोठी मुलगी पाच-सात वर्षांची. बाकीच्या त्याहून लहान ! पण ही मोठी मुलगी दिसायला फार गोड होती. बाकीच्याही चांगल्या होत्या,पण हिचा नूर काही वेगळाच होता.वर्ण गोरा तर होताच पण त्यावर एक तांबूस छटा होती. एखाद्या परीसारखी दिसायची ती. आई-वडिलांना वाटे,कसे वाढवावे यांना? जिवाला घोर !
जवळच किराणा मालाचं दुकान होतं. हातात पैसे आले की तेव्हढ्यापुरते खाण्याचे जिन्नस विकत आणायचे.रोजच मोठ्या बेबीला ते काम करावं लागे. सकाळी ती न चुकता तिकडे जायची.अगदी त्याचवेळी एक मुलगा शाळेच्या बससाठी तिथे येऊन उभा रहायचा. तिच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असेल. बरेचदा तो तिच्याकडे बघून हसायचा.ही गोरी गोरी सुंदर मुलगी त्याला खूप आवडायची. भीड चेपली तेव्हा तो तिच्याशी बोलू लागला.
''तुझं नाव काय?''
''मुमताज. तू शाळेत जातोस ना?''
''हो. आणि तू ?''   मानेने नाही सांगत ती म्हणाली,
      ''आम्ही गरीब आहोत ना, म्हणून शाळेची फी परवडत नाही आम्हाला''
      ''तुम्ही कुठे राहता?'' त्यानं विचारलं, तेव्हा ती उत्तरली, ''पलीकडच्या झोपडपट्टीत''
      एका दिशेकडे बोट दाखवून तो म्हणाला, ''मी त्या बंगल्यात राहतो. माझं नाव लतीफ.''
हळूहळू संवाद वाढू लागला. दोघांना एकमेकांशी गप्पा मारायला आवडू लागलं.ओढ वाटू लागली.पण त्यात एक निरागसपणा होता.
      कळत काहीच नव्हतं,पण एक दिवस तो म्हणाला,'' मला तू खूप आवडतेस. तू एंजल सारखी दिसतेस... मी खूप शिकेन.तू... म्हणजे आपण मोठे झालो ना की आपण लग्न करू. चालेल?''
तिनंही खुद्कन हसून हो म्हटलं. त्यानं हळूच तिच्या गुलाबी गालाला स्पर्श केला.ती हरखून गेली...दिवसभर ती विलक्षण आनंदात होती...जणू तरंगत होती.
      पण काय झालं कुणास ठाऊक ! दुसर्‍याच दिवशी मुमताज सह सगळं कुटुंब दिल्ली सोडून मुंबईला जायला निघालं.! परत न येण्यासाठी !कारण काय ते मुमताजला माहीतच नव्हतं. मुंबईला पोहोचल्यानंतर तिला कळलं, तिचे अब्बाजान तिला  सिनेमात काम मिळावं यासाठी घेऊन आले होते. फार थांबावं लागलं नाही.एंजल सारख्या या मुलीला नवव्या वर्षीच कॅमेर्‍यापुढे उभं रहावं लागलं. तिथून पुढे तिनं मागे वळून पाहिलंच नाही. अनेकांनी तिच्यावर प्रेम केलं. पण ती लतीफला केव्हाच विसरू शकली नाही. कारण ते होतं विशुध्द निरागस पहिलं प्रेम! त्याला वासनेचा ओंगळ स्पर्शही नव्हता.!!
      ही मुमताज कोण ते आलं लक्षात? सौंदर्यसाम्राज्ञी मधुबाला !! जिच्या सौंदर्याला तोड नव्हती व आजही नाही...... असं म्हणतात , 2000 साली जगतिक पातळीवर झालेल्या संशोधनानुसार सर्वाधिक सुंदर नटी असण्याचा मान मधुबालेलाच मिळाला.मृत्यूनंतर चाळीस वर्षांनीही ! सुप्रसिध्द नटी मेरिलीन मन्‍रो च्याही वरचं स्थान तिला मिळालं.1969 साली जेव्हा ती मेली, तेव्हा लतीफ ढसाढसा रडला होता.........
मधुबालेबद्दल खूप काही जाणून घ्यायचं असेल तर ..... पुढच्या एखाद्या भागात !
                 
                                    संगीता जोशी.