Musicajoshi.blogspot.in
Blog
43 . // 5.2.2016
1941 ची
पहिली तिमाही संपत आली होती. ताराबाईचे गर्भारपणाचे दिवसही भरत आले होते. त्याकाळी
बाळंतपणं सामान्यतः घरीच होत असत. पण ताराबाईचं नाव दवाखान्यात घातलं होतं.
ताराबाई दत्तूची बायको. वडील गेल्यामुळे दत्तू व त्याची आई दोघेही दत्तूच्या
बहिणीकडे म्हणजे ताईकडे रहात असत. धुळे शहरात. त्यावेळी ते छोटंसं ‘शहर’ होतं.
म्हणजे शाळा होती; ट्रेनिंग कॉलेज होतं; दवाखाने होते; प्रवासासाठी खाजगी बस
होत्या. मात्र नावाप्रमाणेच धुळीचे रस्ते होते. गल्ल्या होत्या.त्या चांगल्या मोठ्या
होत्या. आगरा रोड, त्याला समांतर अशी खोलगल्ली,पुढे पाचवी गल्लीत. त्यात महादेवाचं
मंदिर होतं; आणि नंतरची सहावी गल्ली.ताईचं घर याच सहाव्या गल्लीत होतं. तारगे भुवन
समोर.जुनं घर शंकरशेट मुंदडांच्या मालकीचं होतं. सहाव्या गल्लीपासून सातव्या
गल्लीपर्यंत. अंगण ,ओटा, ओसरी, लांबच्या लांब माजघर, मग मोठं देवघरासह स्वयंपाकघर.
मागे एका बाजूला बंद मोरी व समोर मोठी उघडी मोरी.5 फूट बाय 5 फूटची.शेजारी आड म्हणजे विहीर. मागे
परस. खूप मोठा. तिथे टॉयलेट व भांडी घासण्याची मोरी. शेवटी मागचं दार. हे भलं मोठं
जाड लाकूड. ते लावून लाकडी सरा एका भिंतीतून ओढून समोरच्या दुसर्या भिंतीत घालायचा की दार सुरक्षितपणे बंद
व्हायचं.
दिवस गेले होते तरी आणि दिवस भरेपर्यंतही
अंगणापासून मागच्या दारापर्यंत आख्खं घर ताराबाईलाच झाडावं लागे. एकदा नव्हे;
दोनदा. आठ दिवसांनी मातीच्या जमिनी शेणानं सारवाव्या लागत. चांगला व्यायाम व्हावा
म्हणून. कामं करत राहिलं की बाळंतपणाला त्रास होत नाही ही विज्ञानाधारित गोष्ट
तेव्हाही ‘अडाणी’ बायकांनासुद्धा माहीत होती. संध्याकाळी चारच्या पुढे ताई व तिची
बहीण ( ही लग्न होऊन सासरी गेली अन् लगेच परत आली;तेव्हापासून ताईकडेच होती; तिला
सगळे मावशी म्हणत.) मावशी महादेवाच्या देवळात पोथीला गेल्या की ताराबाई
संध्याकाळचे केर-वारे करी. कंदिलाच्या,चिमणीच्या काचा पुसून ठेवी. हवं असेल तर
रॉकेल भरून ठेवी. ही संध्याकाळची तयारी करून ठेवावी लागे. कारण वीज नव्हतीच. सासू
घरातच असे. वपन केलेली व लाल अलवाण नेसलेली. म्हातारी. ती काही करू शकत नसे. कारण
डोळ्यांना दिसतच नव्हते. दत्तूची बायको गोरी व दिसायला चारचौघींपेक्षा उठून
दिसणारी आहे,हे तिनं लोकांकडूनच ऐकलं होतं.
देवळातून बायका घरी येईपर्यंत
सासू ताराबाईला जवळ बोलावून विचारपूस करत असे. ‘तुला फार काम पडतं ना गं ?’ ‘ताई
फार बोलते का ग तुला? माझी लेक असली तरी स्वभाव माहीत आहे मला तिचा.’ अशी फुंकरही
घालायची. अन् सांगायची ‘आडावर पाणी ओढायला जाऊ नकोस बरं आता.नववा लागलाय् ना, आता
झेपेल तेवढंच काम कर.
ताईला काय सांगायचं ते मी बघते. पण ताराबाई, मुलीकडे आश्रित रहातोय ना
आपण.
म्हणून सहन करावं लागतं. बोलायला जीभ रेटत नाही.मोहिदेकर मात्र चांगला
माणूस.
दत्तूला आत्तापेक्षा चांगली नोकरी लागली की राहू वेगळे आपण.तोपर्यंत आहे,
तोंड दाबून बुक्कयाचा मार’!
सासवा-सुनांच्यात असं हितगूज चालायचं.
त्या दिवशी संध्याकाळचा केर
काढून झाला. ताराबाईच्या पोटात थोडं दुखू लागलं होतं. ती काही पहिलटकरीण नव्हती.
पहिलं बाळंतपण माहेरी, पुण्याला दवाखान्यातच झालं होतं. पण मुलगा पोटातच गेला
होता. यावेळी ती सावध होती. ताई-मावशी घरी आल्या.तिचा चेहरा पाहूनच ताईनं विचारलं,
‘ताराबाई, काय गं? काही होतंय का ?’
पोट दुखतंय म्टल्यावर म्हणाल्या, ‘थांब अजून. कळा वाढल्यावर दवाखान्यात
जायचं’
दवाखाना गल्लीच्या कोपर्यावरच होता.
डॉ.महाजनींचा. त्यावेळी एखादा डॉक्टर सर्वप्रकारची प्रॅक्टिस करत असे.
स्पेशॅलिस्टचा जमाना नव्हता.
कळा वाढत नव्हत्या. ताईने
पाण्याचा हंडा चुलीवर तापायला ठेवला. मोठ्या परातीत ताराबाईला बसवलं आणि कमरेवर
कढत-कढत पाणी घातलं. सोसवत नव्हतं पण ताराबाई बोलू शकली नाही. उठून नऊवारी साडी
नेसणंही ताराबाईला जड जाऊ लागलं, इतक्या कळा वाढल्या होत्या. ताईमावशी ताराबाईला
घेऊन दवाखान्याकडे निघाल्या.पायीच. दत्तू नोकरीनिमित्त रावळगावला होता. शंभर
पावलांवरच होता दवाखाना.वाहनं नव्हतीच. टांगे असत पण ते फक्त स्टेशनवर
जाण्यापुरतेच.
ताराबाई दवाखान्याच्या
पायरीवर बसली. लेबर रुम पहिल्या मजल्यावर होती. डॉक्टरांची बायको,यमूताई ताराबाईची
मैत्रीणच होती. तिनं हाताला धरून तिला वर नेलं. निरोप मिळाल्यामुळे डॉक्टर लगबगीने
आले. पण ते वरच्या मजल्यावर जाईपर्यंत यमूताई व नर्सच्या मदतीनं ताराबाई सुखरूप
बाळंत झाली होती. आठ पौंडाचं बाळ जन्माला आलं होतं. अमावास्येच्या रात्री
साडेबाराचा मुहूर्त गाठला होता बाळानं !
दुसर्या दिवशी पहाटेच
ताईच्या ओट्यावर वाजंत्री वाजू लागली.सगळी गल्ली कान देऊ लागली. गुलाबशेट मारवाडी
कोपर्यावरच्या आपल्या दुकानातून येऊन ताईकडे डोकावला. ‘काय ताई, मामींना
(ताराबाईंना) मुलगा झाला ना? तरीच वाजंत्री वाजतीय. सुखरूप सुटका झाली ना?’
‘गुलाबशेट, सुखरूप झाली;मुलगी
झाली दत्तूला. मुलगा नाही’...ताई.
‘अरेच्या? मुलगी झाली अन् तरी
वाजंत्री लावली?’ गुलाबशेट बोलले.
‘ मग? आम्हाला मुलगी सुद्धा
मुलासारखीच आहे.’
‘भाग्यवान आहे म्हणायची
मुलगी’! गुलाबशेट गेले.
इतक्या जुन्या काळी मुलगी झाल्याचा आनंद त्या पिढीनंही व्यक्त केला हे
विशेषच म्हणायला हवे.आज मुलीचा गर्भ वाचविण्यासाठी प्रबोधनाचा आटापिटा करावा लागतो
त्या पार्श्वूभूमीवर त्या ‘अडाणी’ लोकांचा विचारांचा सुशिक्षितपणाच सुसंस्कृतपणा
उठून दिसतो.
********