तो आणि ती...पूर्वीच्या
काळातील...
एक टिपूर चांदणी रात्र ....त्रिपुरी
पौर्णिमा असावी तसं.... हवेत हवाहवासा वाटणारा गारवा. (टिपूर शब्दाचा उगम त्रिपूर
याच शब्दात असावा ) नदीचा बांध... गावापासून दूर... अगदी गावाच्या
सीमेपार...सायंकाळपासूनच ती दोघं होती. त्या बांधावर...आतुरतेनं एकमेकांना
भेटलेली. उत्कट प्रेमानं भरलेल्या मनानं..दोघांनाही खूप बोलायचं होतं..खूप
सांगायचं होतं... पण संभाषणच अडलं होतं... ''किती थंडी आहे, नाही?'' आणि
''हळूहळू वाढणारच आहे !'' या
पलीकडे शब्द सरकत नव्ह्ते.
''उद्या किती वाजताची गाडी ?'' काहीतरी विचारायचं तसं ती विचारते.
तंद्रीतून जागं झाल्यासारखं तो
उत्तरतो, '' चारची. ''
'' मी येऊ स्टेशनवर ? ''
'' कशाला ?.... उगीच... सगळे असतील... ''
'' मग आजच निरोप द्यायचा मी?''
'' अगं, मी पुन्हा येईनच ना लवकर..''
'' म्हणजे? परीक्षा अलीकडे आल्याएत? '' ती.
'' नाही गं. परीक्षा झाल्यावरच...
नेहमीप्रमाणे...''
'' म्हणजे अजून सहा महिने.! तिचा कापरा स्वर.
'' हे बघ, तू असं बोललीस तर माझा अभ्यास होणार नाही.'' तो.
''................'' तिचं मौन.
'' आणि हो, मला दर आठवड्याला पत्र आलं पाहिजे हं तुझं. हॉस्टेलवर
फोन घेता येत नाही !'' तो आर्जवून सांगतो.
ती म्हणते, '' दर आठवड्याला नाही जमलं, तर?''
'' ते काही नाही !'' तो
अधिकारानं सांगतो, '' नाहीतर माझं अभ्यासात लक्ष लागणार नाही....'' ती हसते अन्
म्हणते, '' तूही पाठवशील ना ? का मला वाट पाहायला लावशील?''
'' पाठवीन. पण एखादेवेळी नाही
जमलं तरी तू रागवायचं नाही..''
तिला माहीत असतं की तो पत्रातून
हेच लिहिणार आहे ' रागावू नकोस, बरेच दिवसात लिहू शकलो नाही.....खूप सबमिशन होतं
...परीक्षाही जवळ येतेय्...'
पुन्हा बांधावर ती भानावर येते..तो म्हणतो, '' चांदणं किती छान
पडलंय् नं? चंद्र पहा किती सुंदर आहे ! मी गेलो ना, की तू रोज ह्या चंद्राकडे
पाहात जा. मीही त्याचवेळी तिकडे चंद्राकडे पाहीन. हा चंद्र आपल्यामधे कॉमन. म्हणजे
आपण शेजारीच उभे आहोत असे वाटेल. नाही का?''
'' पण चंद्र काही रोज नसतो...
अमावास्या येतच असते.. तेव्हा ?... '' ती.
''तेव्हा अंधार हाच कॉमन
फॅक्टर..गंमत आहे नं? '' तो तिची समजूत घालतो.
पुढे म्हणतो, '' बरं, उद्या मी
जाणार ! आजच्या या चांदण्या रात्रीची आठवण राहील असं एखादं गाणं म्हण ना ...''
''नको, आसपास इतरही माणसं
आहेत..'' तिचा मूड नसतो.
'' लांब बसलेली आहेत ती. लहान
आवाजात म्हण पाहिजे तर..फक्त मला ऐकू येईल असं...''
ती संकोचते. खांद्यावरचा
त्याच्या हाताचा स्पर्श तिला आग्रह करतो. आणि त्या ऊबदार क्षणी तिचे स्वर
उमटतात...
'' रुक जा रात ठहर जा रे
चंदा, बीते ना मिलन की बेला
आज चांदनी की नगरी में
अरमानों का मेला....''
पण ती रात्र काही थांबणार
नसते... आणि तो चंद्रही....!
काळही थांबणार नसतो....ते
शंकर-जयकिशन...ती मीनाकुमारी, राजेन्द्रकुमार..राजकुमार ......सगळयांवर कधीच
काळाचा पडदा पडला...
पण असे कित्येक ''तो आणि ती'' आहेत ज्यांच्या मनात त्या सुरांचं
एक शिल्पित मंदिर कायमचं उभारलं गेलंय्...दिल एक मंदिर...
संगीता
जोशी.
---------------------------------------------------------------------------------------