Saturday, September 7, 2013

भेट
कालची ती एक रम्य संध्याकाळ... अखिल भारतीय साहिय्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द.भि. कुलकर्णी यांना भेटायला जायचं होतं.. मी त्यांना पहिल्यांदाच भेटणार होते. पहिली भेट !कोणत्याही पहिल्या भेटीची असते तशी उत्सुकता होतीच. थोडं दडपण..थोडी धडधड..सगळंच !  वेळ आधी घेतलेलीच होती. डीएसकेविश्व संकुलात जायचं होतं. एकदा फार पूर्वी गेले होते त्या संकुलात... थोडंसं आठवत होतं इतकंच. फारसं शोधावं लागलं नाही... बर्‍याच जवळ जाऊन पोहोचले होते,,, तेवढ्यात एका बाईंनी हाक मारली, ‘ अहो, दभींकडेच आलाएत ना? मग इकडे या.’
‘द.भि इथेच राहतात ना?’...
....आणि मी बरोबर चार वाजता त्यांच्या दारापुढच्या छोट्या बागेत... छानशा ‘सिट आऊट’मध्ये उभी होते. डोक्यावर कॅनॉपी..मावळत्या सूर्याची कललेली उन्हं...
त्या बाई आणि त्यांच्याबरोबरचे लोक गेले...आणि दभी बाहेर आले...त्यांनी माझं स्वागत केलं; मी वाकून नमस्कार केला. मनात भावना होती, ते माझ्यापेक्षा वयानं, मानानं व मुख्य म्हणजे ज्ञानानं मोठे आहेत ! आदराने मी आपोआप नम्र झाले होते. कृत्रिम वागण्याचा माझा स्वभाव नाहीच... आणि तेही स्पष्ट व परखड बोलणारे, असं माहीत होतं.
आम्ही सिटआऊट मध्ये बसलो. त्यांनी संबोधित केलं, ‘संगिताताई, प्रथम तुमच्याबद्दल सांगा. घरी कोण कोण; मुलं काय करतात....’
मी थोडक्यात सांगितलं. मोठा मुलगा पॉलीमर इंजिनियर आणि उर्दू-पर्शियन मध्ये एमए. गोल्ड मेडॅलिस्ट. धाकटा मुलगा सॉलिसिटर. मुंबई च्या फर्ममध्ये पार्टनर.... मलाही त्यांच्याबद्दल विचारायचं होतं. तसं मी माहितीचं थोडं होमवर्क करून गेले होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तिकेचा आधार होता. पण मी त्यांचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. पुस्तकांची नावंही एकदम भारदस्त !...मी आर्टस् ग्रॅज्युएट नसल्याचा हा एक दुष्परिणाम आहे ! माझं साहित्याचं सखोल असं वाचन कमी पडतं.
 त्यांच्याबद्दल त्यांनी मोकळेपणाने सांगायला सुरवात केली. त्यांचा प्रेमविवाह होता. पत्नीचं नाव शिवरंजनी ! ते नाव त्यांनीच आवडीने ठेवलं होतं. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा समारंभ पाहण्याच्या दोन महिने आधीच त्या निवर्तल्या. ते ऐकून मला वाईट वाटलं. क्षणभराच्या शांततेनंतर ते बायकोबद्दल दिलखुलासपणे म्हणाले, ‘आमचा जोडा अजिबात शोभत नव्हता..इतकी ती सुंदर होती... गोरी पान... कोकणस्थ ब्राह्मण होती ना ! आणि मी देशस्थ !..मी असा...मी माझ्या आईसारखा आहे..ती फार प्रसिध्द कुटुंबातली होती. धनंजयराव गाडगीळांची पुतणी....माझी आई ब्याण्णव वर्षांची होऊन गेली..आई खान्देशातली होती.. मी नागपूरला युनिव्हर्सिटी मधे ‘एचओडी’ होतो... त्यापूर्वी 1960 ते 64 या वर्षात मी कोल्हापूरला होतो. माझ्या आयुष्यातला तो काळ फार छान गेला....तसं सगळं आयुष्य सुखासमाधानातच गेलं... शिवरंजनी(पत्नी) होती.. (स्तब्धता....) हे नाव मीच ठेवलं होतं बरं का.. माझी विद्यार्थिनीच होती ती...आणि तुम्हाला सांगतो, तिनंच मला प्रपोझ केलं ...!’
मी ‘अरे वा’ म्हटलं आणि आम्ही दोघंही मनमोकळं हसलो... आधी आलेला ताण कमी झाला.
सर मराठीचे मोठे लेखक, ख्यातनाम समीक्षक पण त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं यावर विश्वास बसेल? पण ठेवायला हवा ! कारण तेच खरं आहे. आणि खरं आश्चर्य तर पुढेच आहे; ते म्हणाले, ‘मी मॅट्रिक पर्यंत एकही मराठी पुस्तक वाचलं नव्हतं !!’
अरे,बापरे ! असा उद्गार माझ्या तोंडून न निघता तरच नवल ! ‘पण हे कसं काय? कारण त्यावेळी तर इंग्रजी माध्यमाचं एवढं फॅड नव्हतं.’ मी स्वाभाविकपणे विचारलं.
ते उत्तरले, ‘माझे वडील रेल्वेत होते ना; मोठ्या हुद्द्यावर होते....त्यामुळे त्यांच्या सारख्या बदल्या व्हायच्या...ते जिथं जातील तिथं सेंट्रल स्कूल ला आम्हाला घातलं जायचं...’
(अरेच्या ! आईबद्दल अधिक विचारायचंच राहिलं ...मी मनात म्हटलं...कारण तेवढ्यात ते आत गेले आणि काय-काय खाद्यवस्तू घेऊन आले.)
मी त्यांचं आतिथ्य अनुभवलं. अजून आम्ही घरच्याच गप्पा मारत होतो. ‘माझी नात.. नेहा.’ त्यांनीच सुरुवात केली. ‘इथंच असते... मुलगाही इथेच असतो...आधी एअर इंडियात होता... आणखी एक फ्लॅट आहे, तिकडे जाते ती अभ्यासाला...इंजीनियरिंगला आहे.’ मी विचारल्यावर म्हणाले, ‘नाही; तिला वा*मयाची अजिबात आवड नाही बरं का !’
मनात आलं, असं बर्‍याच ठिकाणी दिसतं हल्ली. आजची पिढी ..जीवनात ..सामाजिक संघर्षात इतकी उसासारखी पिळवटून निघते आहे की त्यांना अशा कुठल्या गोष्टीत रस वाटेनासाच झाला आहे....टेक्नॉलॉजी आणि ते ! बस्...यातच ते गर्क आहेत. फक्त नेहाच नाहीः सगळेच...... काय होणार पुढे या पिढीचं? ह्या चक्रातून बाहेर पडल्यावर, ह्या वयातून ते पुढे गेल्यावर कशात आनंद शोधतील ?
‘......पण तशी शिवरंजनीलाही साहित्याची आवड नव्हती...’ दभी म्हणाले. मी काय बोलणार?
‘मला Astrology ( फलज्योतिष) या विषयातही खूप रुची आहे, बरं का’ दभी पुढे म्हणाले. मग आम्ही त्या विषयावर थोडं बोलत राहिलो. मला काही प्रश्न विचारून त्यांनी माझी रास कुठली असेल याचा अंदाज केला आणि तो चक्क बरोबर होता. (अरेच्या ! त्यांची रास कुठली, हे विचारायचंच राहिलं !) त्यानंतर आमचं गझल बद्दल बोलणं सुरू झालं. 
दभींची साध्या संभाषणाची भाषा देखील अलंकारप्रचुर आहे... शब्दांचा नेमकेपणा...आणि ते शब्दही आपल्या नेहमीच्या वापरातील नव्हेत ! ठेवणीतले ! जणू भरजरीच.
मी बोलत होते, ‘मुक्तछंद ज्या काळात खूप फोफावला होता, त्या काळात गझल लिहिली जाऊ लागली. गझल ही वृत्तबद्ध कविता असल्याने तिची प्रथम खूप उपेक्षा झाली....वगैरे.’
मात्र, दभी वृत्तबद्ध कवितेच्या बाजूने होते, हे पाहून मला बरे वाटले. ते म्हृणाले, ‘मुक्तछंद म्हणजे तोडून तोडून गद्य लिहिणं नव्हे. अजूनही कवींचा त्याबाबत तसाच समज आहे. तो गैरसमज सोडला पाहिजे. मुक्तछंद म्हणजे, एखादा आहे तो छंद मुक्त करणं. उदाहरणार्थ, पादाकुलक घेऊ; जो सोळा मात्रांचा असतो. त्यात कधी पंधरा तर कधी सतरा मात्रांच्या ओळीत लिहिणं; असं त्या जखडलेल्या छंदाला मुक्त करणं, म्हणजे मुक्तछंद ! सर्व छंदांपासून मुक्त होणं नव्हे....कालप्रवाहाच्या विरुद्ध पोहोणं नव्हे.’
दभी बोलत राहिले, मला तरी दुसरं काय हवं होतं? मी होता होईल तेवढं टिपून घेत होते...पॅडवर पेननेही आणि मनात टीपकागदाप्रमाणेही...!
‘तुम्ही गझलकार कवयित्री आहात म्हणून माझे गझलबद्दलचे विचार सांगतो. गझलेचे चार टप्पे मी मानतो. 1.गझलसदृश रचना 2. माधव ज्यूलियन यांनी जाणीवपूर्वक लिहिलेल्या गझला.(पण गज्जलांजली या संग्रहात त्यांनी स्वतःच म्हटलं आहे की त्या गझला त्यांनी केवळ प्रयोग म्हणून लिहिल्या आहेत—दभी) 3. सुरेश भटांची शुध्द स्वरूपातील गझल. अंतरंग उकलणारी गझल... बेहोशी व तन्मयतेने लिहिलेली गझल. प्रयोग म्हणून नव्हे, वृत्ती व आंतरिक हाकेला ओ देण्यासाठी लिहिलेली गझल...भावनेचा आविष्कार म्हणून आलेली गझल... त्यांचं कार्य मोठं आहे.. त्यांनी गझला नुसत्या लिहिल्या नाहीत तर गझलेचा प्रसार,प्रचार केला...कवींना मार्गदर्शन केलं..ते गझल साठी झटले....’दभी बोलत राहिले, ‘आणि चौथा टप्पा...4.भटांनंतरची गझल..
‘ पण मी मर्ढेकरांचा चाहता..... त्यांचा भक्तच ! मर्ढेकर आणि भट, यांची अगदी विरुध्द प्रकृती...म्हणजे काव्यप्रकृती.....सौंदर्यशास्त्रानुसार कविता ही वाचनार्थ असते,श्रवणीय नसते; कवितेत चिंतन,वैचारिकता, ज्ञानात्मकता असते, हे मर्ढेकरांचे म्हणणे; तर भटांच्या मते ती समूहाने श्रवण करायची असते. भटांनी कवितेचं नातं वक्त्तृत्व, संगीत आणि नृत्याशी जोडलं. ते स्वतः गझल गाऊन म्हणत हे आपल्याला ठाऊकच आहे. आज गोकुळात रंग....सारख्या त्यांच्या रचना तर मला नृत्याविष्कारच दाखवतात. मी भटांच्या सत्तावीस अशा रचना शोधून काढल्या आहेत की ज्यात मला नृत्य दिसतं ! कविता ही अर्थनृत्य पूर्ण असेल तर आस्वादाचा आनंद अलौकिकच म्हटला पाहिजे.
‘म्हणजे मला म्हणायचं आहे की मर्ढेकर कवितेला शुध्द करत होते, तर भट इतर कलांना बरोबर घेऊन कवितेला समृध्द करत होते ! भटांची कविता ही त्यामुळे लोकानुरंजन करते.’
दभीं नी मुद्दाम अधोरेखित केले,  ‘मी भटांचा निःसीम चाहता आहे, बरं का ! आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. मराठी संप्रदायात  चारच प्रवर्तक कवी होऊन गेले. एक केशवसुत, दुसरे तांबे, तिसरे मर्ढेकर आणि चौथे आहेत सुरेश भट. भट हे मनस्वी, बेहोश, व्यवहाराची पर्वा न करणारे... भटांवर, मला वाटतं, श्रीकृष्ण पोवळेंचा प्रभाव होता. अगदी सुरवातीला होता. आणि पोवळ्यांवर उमरखय्यामचा.
‘मी मघाशी सांगितल्याप्रमाणे मर्ढेकरवादी असलो तरी भटांचा चाहता आहे. माझं पुस्तक ‘सुरेश भट—नवे आकलन’ जरूर पाहा.
‘मी म्हणतो, भटांच्या कवितेचा पक्षी माझ्या मणिबंधावर बसतो, मी त्याला आसुसून पाहातो; पण तो उडतो, पंख पसरतो तेव्हा त्याच्या पंखाच्या आतले आकर्षक रंग मला मोहवून टाकतात....
‘मी असं म्हणतो याला कारण आहे.  त्यांच्या कविता-गझलेची पहिली ओळ वाचतो; म्हणजे त्या पक्ष्याला पाहतो; पण दुसरी ओळ? ती सामर्थ्यवान असते... पक्षी उडाल्यावर ते आतले रंग ...वाः ! सुंदर !
उदाहरण सांगू ?...   
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल....         किंवा---
दूर दूर तारकात बैसली पहाट न्हात
                   बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग..
पाहिलेत दुसर्‍या ओळीतले अनोखे रंग ?’
दभीं नी दिलेल्या सुंदर उपमेत मी हरवून गेले. क्षणभर निःशब्दच झाले. माझ्या मनगटावर खरोखरचा एक देखणा पक्षी बसला. मनमोहक रंगाचा...आणि पंखाच्या आत भारद्वाजा सारखे, फ्लेमिंगो सारखे भगवे-गुलाबी रंग असलेला...आणि पंख पसरून उडतांना मी तो पाहिला...!
आणखीही खूप बोलणं झालं. किती साठवायचं?किती आठवायचं ? तो पक्षी..त्या पक्ष्याची पिसं जणू मनावरून फिरत होती...
सिट-आऊट मधल्या सोफ्यावरून, डीएसके विश्व च्या उंचीवरून आता पुणं तेजाळलेलं दिसत होतं. आकाशात चंद्र होता, पण एक तुकडा उडालेला. तो माझ्या ओंजळीत तर नव्हता ना पडला? तसंच असावं...तरीच माझ्या मनात प्रसन्न शिंपडण झालेली जाणवत होती....काळ्या आकाशाच्या पडद्यावर धायरीचे दिवे चमचमत होते...माझ्या आनंदाची पौर्णिमा घेऊन मी निघाले. एक बौध्दिक, साहित्यिक, निखळ आनंद ! आज दभींसमोर बसून मी चक्क गप्पा मारल्या ?..खरंच; मी त्यांच्या कॉलेजात का नव्हते? त्यांची विद्यार्थिनी म्हणून ? अशी कितीतरी लेक्चर्स ऐकायला मिळाली असती ! पण आज...पण इथंच थांबायचं नाहीए....
आज कालच्या संध्याकाळच्या आठवणी मनात ताज्या होत होत्या. वाटत होतं, कालच्या प्रमाणेच गाडी काढावी...जावं...पुन्हा पुन्हा जात रहावं... अजून खूप ऐकायचं आहे...खूप समृध्द व्हायचंय्... खूप काही विचारायचं राह्यलंय्...मिळालं खूप ...तृप्ती? हो, आहे; पण अतृप्ती जास्त आहे...कळतंय् की ती ज्ञानगंगा आहे..... मी ओंजळीनं किती घेणार? माझी क्षमता ती काय ! वाटलं, अतृप्ती हे देखील एक वरदान असतं...ते तुम्हाला पुन्हा त्या ज्ञानगंगेच्या प्रवाहाशी नेऊन उभं करतं....यालाच म्हणतात सार्थक...!
                                                    
                                                    

-------------------------------------------------------------------------------------------------------